आशियात सर्वात मोठे पुनर्भरण तापी नदीवर
मुंबई, प्रतिनिधी, दि. 01 - पाण्याचा बेसुमार वापर आणि सातपुडा पर्वताच्या पायातील रुंदीत झिरपत जाणारे पाणी यामुळे तापी नदीच्या खोर्यात भूजल पातळी खालावत चालली आहे. दरवर्षी 1 मीटर दराने कमी होणार्या भूजल साठ्याची दरी भरून काढण्यासाठी महाकाय पुनर्भरण योजना हाती घेण्यात येणार आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या ठरणार्या या प्रकल्पाचा 5428 कोटींचा खर्च केंद्र सरकार उचलणार असून, महाराष्ट्र व मध्य प्रदेशला 33 टीएमसी पाण्याचा लाभ मिळू शकेल. यंदा अर्थसंकल्पात तरतूद करून लवकरच हे काम सुरू करण्यात येणार आहे.
पाच वर्षांत पाणीपातळी वाढीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. सातपुडा पर्वतातून तापी नदी वाहते, पावसाचे प्रमाण जास्त असले तरी नेपानगर, बुर्हाणपूर, रावेर, यावल व चोपडा तालुक्यांत उपलब्ध पाण्याचा बेसुमार वापर होत असल्याने पाणीपातळी खालावत आहे. उपाय म्हणून पुनर्भरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाचा हा प्रकल्प माजी अधीक्षक अभियंता वसंत पाटील यांच्या कल्पनेतील आहे. गेली 15 वर्षे ते यावर काम करत आहेत. केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी जानेवारीत या भागाची पाहणी केली आणि प्रकल्पाचा भविष्यात होणारा फायदा लक्षात घेऊन योजनेचा खर्च उचलण्याचे मान्य केले.
बुर्हाणपूरपर्यंतचा प्रकल्प प्रस्तुत प्रतिनिधीने बघितला आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन प्रकल्पाबाबत म्हणाले, पावसाचे प्रमाण जास्त असल्याने जळगाव भागात पाणी मुबलक आहे. परंतु केळीच्या उत्पादनामुळे उपसाही मोठा असून, पाणीपातळी खालावत आहे. 500 फुटांहून खोलवर बोअर घ्यावा लागतो. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या रूंदीत पाणी जात असल्याने साठा कमी होत असल्याचे 2003 मध्ये आढळून आले. जागेचा अभ्यास केल्यावर पुनर्भरणातून पातळी वाढवता येईल असे लक्षात आले. त्यादृष्टीने योजना हाती घेतली व पाठपुरावा केला. केंद्रीय भूजल मंडळानेही पाहणी करून सकारात्मक अहवाल दिला आहे. केंद्राने या कामी टास्क फोर्स स्थापन केला असून आजवर त्याच्या पाच बैठका झाल्या आहेत. राज्याकडे पैसे नसल्याने आम्ही केंद्राकडे मदत मागितली. केंद्रीय मंत्री उमा यांनी प्रकल्प पाहिल्यावर खर्च देण्याचे मान्य केले.