Breaking News

जिल्हयात चित्ररथाच्या माध्यमातून होणार योजनांचा प्रचार व प्रसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय व समता वर्षानिमित्त आयोजन

नाशिक/प्रतिनिधी। 10 -  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जयंती वर्षानिमित्ताने सन 2015-16 हे वर्ष सामाजिक न्याय व समता वर्ष साजरा करण्यात येत आहे. या समता वर्षा निमित्त शासनाच्या वतीने समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती तळागाळात पोहचावी. या उद्देशाने  चित्ररथ काढण्यात आला आहे. शासनाचा हा चित्ररथ दि.9 फेब्रुवारी 2016 पासून ते 29 फेब्रुवारी 2016 पर्यंत (21 दिवस) जळगांव जिल्हयात फिरणार आहे.
दि.22 जानेवारी 2016 रोजी नंदुरबार जिल्हयातील धडगांव येथून या चित्ररथाला सुरूवात झाली. 9 फेब्रुवारी 2016 रोजी धुळे जिल्हयातून जळगांव जिल्हयातील पारोळा येथे या चित्ररथाचे आगमन होणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून नाशिक विभागात व्यापक प्रमाणात जनजागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चित्ररथात लोकसंगीत व पथनाट्यादवारे जनप्रबोधन व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यांच्या गौरवाची गौरवगाथा सादर करण्यात येणार आहे.  पारोळा येथे मा.आमदार श्री.सतिष आण्णा पाटील यांच्या हस्ते चित्ररथाचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर या चित्ररथातच्या माध्यमातून तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी पथनाटय, कलापथक संच यांचे जनजागृती कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
पारोळा नंतर रत्नाप्रिंपी मार्ग अमळनेर (2 दिवस) - धरणागांव- चोपडा (2 दिवस) - यावल  रावेर  मुक्ताईनगर  बोदवड  भुसावळ (2 दिवस)  जामनेर - जळगांव (2 दिवस)  एरंडोल  पाचोरा (2 दिवस) - भडगांव  चाळीसगांव (2 दिवस)   असा चित्ररथाचा जळगांव जिल्हयातील 21 दिवसाचा जनजागरण कार्यक्रम आहे. चाळीसगांव हून चित्ररथ नाशिक जिल्हयाकडे 1 मार्च 2016 रोजी प्रस्थान ठेवणार आहे. या चित्ररथात जळगांव जिल्हयातील स्थानिक कलावंत, लोक कलापथक हे लोकसंगीत, लोकगीते अर्‍हाणी भाषेच्या माध्यमातून सामाजिक जनजागृती करणार आहेत. शाहीर शिवाजीराव पाटील, शाहीर डॉ.पंकजकुमार नन्नवरे, शाहीर, नामाभाऊ पाटील, शाहीर, निवृत्ती लोमेश खंबायत, शाहीर, दिपक सैंदाणे, शाहीर निवृत्ती लोमेश खंबायत, शाहीर रमजान तडवी, शाहीर कुणाल बोदडे, शाहीर विनोद ढगे आदी स्थानिक लोककलावंत/शाहीर आपल्या कलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणार आहेत.
14 एप्रिल 2016 रोजी या चित्ररथाचा अहमदनगर जिल्हयात समारोप होणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध विकास आणि कल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार करुन त्याद्वारे मागासवर्गीय समाज घटकांचे सक्षमीकरण करण्याच्या मुख्य उद्देशाने शासनाने या समता चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे.या चित्ररथाचे आयोजन व संयोजन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक श्री.काशिनाथ गवळे व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जळगांव, राकेश पाटील यांनी केले आहे.