Breaking News

दारणा धरणातून शेतीसाठी एक आवर्तन देण्यात यावे - पालकमंत्री


 नाशिक /प्रतिनिधी। 6 -  दारणा धरणातुन येत्या काही दिवसात शेती आणि पिण्याचे पाणी मिळून एक आवर्तन सोडण्यात यावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात गोदावरी डावा व उजवा कालवा पाणी वाटप बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार  बाळासाहेब सानप, राजाभाऊ वाजे, स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब कांबळे, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे, महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण गेडाम, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त एस.जगन्नाथन्, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश मोरे आदी उपस्थित होते.
श्री.महाजन म्हणाले, पिण्याच्या पाण्यासाठी दारणा समुहातून तीन आवर्तने सोडण्याचे यापूर्वी निश्‍चित करण्यात आले आहे. मात्र शेतात उभ्या असलेल्या फळपिकांचे नुकसान होऊ नये यासाठी केवळ पहिले आवर्तन शेतीसाठी सोडण्यात येईल. त्यात 2000 एमसीएफटी पाणी गोदावरी डाव्या कालव्यातून सोडण्यात येईल. यावेळी पाण्याची गळती होणार नाही आणि नियमबाह्य पद्धतीने पाणी उचलले जाणार नाही याची दक्षता अधिकार्‍यांनी घ्यावी. जिल्ह्यातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. शहरी भागात पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे आणि  पाण्याचे गळती रोखण्याचे उपाय तातडीने करण्यात यावे, अशा सुचना त्यांनी दिल्या. धरणाच्या खालच्या भागाला पाणी सोडताना पाण्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी भविष्यात पाईप लाईनद्वारे पाणी सोडण्याबाबतही विचार करण्यात येत असल्याचे श्री.महाजन यांनी सांगितले. पाणी वाटप समस्येवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी योग्यप्रकारे नियोजन करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. श्री.विखे-पाटील यांनी पाण्याचा काटकसरीने वापर होईल याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, असे सांगितले.
बैठकीत पाण्याच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. श्री.मोरे यांनी दारणा समुहात उपलब्ध पाणीसाठा आणि आवश्यक मागणीविषयी माहिती दिली. दारणा समुहात तीन आवर्तनासाठी 4900 एमसीएफटी पाणी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.