Breaking News

सामाजिक न्याय विभागाची मुलींच्या 50 शासकीय वसतिगृहांना मंजूरी


 नाशिक /प्रतिनिधी। 6 -  महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात मागासवर्गीय मुलींसाठी नवीन 50 शासकीय वसतिगृह सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. नाशिक जिल्हयात त्र्यंबकेश्‍वर व नाशिक येथे मुलींचे शासकीय वसतिगृह मंजूर व्हावे. यासाठी नाशिक जिल्हयाचे खासदार मा.श्री.हेंमत गोडसे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. यात 7 वसतिगृह हे 250 क्षमतेची विभागस्तरावरील व 43 वसतिगृह 100 क्षमतेची तालुकास्तरावरील आहेत. 
नाशिक विभागात नाशिक येथे 250 क्षमतेचे विभागस्तरीय वसतिगृह, त्र्यंबकेश्‍वर येथे 100 क्षमतेचे, अहमदनगर जिल्हयात संगमनेर व लोणी येथे मुलींच्या 100 क्षमतेच्या नवीन वसतिगृहांना मान्यता देण्यात आली आहे.
मुलींसाठीची सर्व शासकीय वसतिगृहे हे सुसज्ज अशा शासकीय इमारतीमध्ये कार्यरत करण्याचा शासनाचा मानस आहे. ही वसतिगृहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती निमित्ताने खास बाब म्हणून सुरु करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने संबंधित जिल्हाधिकारी यांनी वसतिगृहांकरिता प्राधान्याने शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करावी.असे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आले आहेत. ज्या मुली स्पर्धा परिक्षा केंद्रामध्ये प्रवेशीत असतील अशा मुलींसाठी जागा गुणवत्तेनुसार या वसतिगृहामध्ये राखीव असणार आहेत. या वसतिगृहामध्ये निर्माण होणारी पदे विशेषत्वाने महिला उमदेवारांमधून भरली जाणार आहेत.