नगरपालिका निवडणुकांत काँग्रेसची बाजी
मुंबई, प्रतिनिधी, दि. 13 - पराभूत मानसिकतेला दूर करत, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसने विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. राज्यातील 19 नगरपालिका व नगरपंचायतींच्या निकालात काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला धोबीपछाड दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज्यभरात बाजी मारत दुसर्या क्रमांकाच्या जागा पटकावल्या आहेत, तर शिवसेनेने भारतीय जनता पक्षापेक्षा दुप्पट जागा जिंकून मित्रपक्षासमोर नवे आव्हान उभे केले आहे. राज्यातल्या 19 नगरपालिका व नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. एकूण 331 जागांपैकी सर्वाधिक 104 जागा जिंकून काँग्रेसने पहिला क्रमांक पटकावला, तर राष्ट्रवादीने 78 जागा जिंकल्या. काँग्रेस व राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढले असले तरी सत्ताधारी भाजप व शिवसेनेपेक्षा या दोन्ही विरोधी पक्षांनी तब्बल दोन तृतीयांश इतक्या जागा जिंकत सरकारला दणका दिला आहे. शिवसेनेने 57 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 33 जागांवरच समाधान मानावे लागले.
काँग्रेसने 19 पैकी नांदेड जिल्ह्यातील नायगाव व हिमायतनगर, उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, नंदूरबार जिल्ह्यांतील आक्राणी, नाशिक जिल्ह्यांतील दिंडोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील जिवती व कोरपना या सात नगर पंचायतीत स्पष्ट बहुमत पटकावले.
राष्ट्रवादी काँग्रेसने गृहराज्यमंत्री राम शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या जामखेडमध्ये एकहाती सत्ता पटकावली आहे. त्यासोबतच माणगाव, म्हसळा, शेवगाव या नगरपंचायतीतही राष्ट्रवादीने बहुमत मिळवले.
शिवसेनेने तळा आणि पोलादपूर या दोन नगरपंचायतींवर भगवा फडकवला आहे, तर भारतीय जनता पक्षाला एकाही नगरपंचायतीवर विजय मिळवता आला नाही. आजच्या या निकालाने मंत्रिमंडळातल्या बहुतांश मंत्र्याच्या जिल्ह्यातच भाजपला पराभव पत्करावा लागला आहे. चंद्रपूर या मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात कोपरणा व जिवती या दोन्ही नगरपंचायती काँग्रेसने पटकावल्या.