Breaking News

हक्काच्या घरासाठी गिरणी कामगारांचे जेल भरो!


मुंबई, प्रतिनिधी, दि. 13 - येत्या मार्चमध्ये होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हक्काच्या घरासाठी गिरणी कामगारांनी जेल भरोची हाक दिली आहे. कामगारांच्या घरांबाबत सरकार जोपर्यंत अधिकृत निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार नुकताच गिरणी कामगारांच्या मेळाव्यात करण्यात आला.
जेलभरो आंदोलनाआधी पत्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी दिला आहे. गेली  15 वर्ष आम्ही आंदोलने केली, चळवळी केल्या परंतु अद्याप आम्ही वंचितच राहिलो.
विरोधी पक्षात असताना युती सरकारने आम्हाला साथ दिली. परंतु जेव्हा मदतीची वेळ आली तेव्हा मात्र पाठ फिरवली. आघाडी सरकारने आमच्या घरांसाठी कायदे उपलब्ध करून दिले. परंतु या कायद्यांची अमलबजावणी केव्हा होणार, अशा आशयाचे पत्र सर्व 
गिरणी कामगार मुख्यमंत्र्यांना पाठवणार आहेत.
प्रत्येक आमदारांच्या घराजवळ आंदोलन करणार
या आंदोलनानंतर प्रत्येक राज्यातील, शहरातील आमदारांच्या घराजवळ जाऊन प्रलंबित मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणार आहेत.म्हाडाकडे दहा गिरण्यांची जागा उपलब्ध असूनही बांधकाम सुरू नाही. एमएमआरडीएची घरे बांधून तयार झाली असताना घरांसाठी सोडत काढली जात नाही, मुंबईतील एकूण सहा गिरण्यांच्या ठिकाणी बांधण्यात येणारी घरे वेस्टर्न इंडिया मिल येथे मिळावीत, अशी मागण्या घेऊन कामगार आंदोलनात उतरणार आहेत. पत्र आंदोलन, ठिय्या आंदोलन पार पडल्यानंतर 11 मार्च रोजी आझाद मैदानावर राज्यभरातील सर्व कामगार एकत्र येऊन जेल भरो आंदोलन करणार  जोपर्यंत सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत जेलमध्ये राहण्याची तयारी कामगारांनी केली आहे. या आंदोलनाची रूपरेषा ठरवताना गिरणी कामगार संघर्ष समितीचे सरचिटणीस प्रवीण घाग, महाराष्ट्र कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिल्लारे, राष्ट्रीय मिल मजदूर कामगार संघटनेचे खजिनदार निवृत्ती देसाई, सेंच्युरी मिल एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, गिरणी चाळ संघटनेचे जनार्दन देशमुख उपस्थित होते.