Breaking News

उत्तर भारत धुकाटला


भारत हा देश केवळ सांस्कृतिकदृष्ट्याच विविधतेने नटलेला नाही तर भौगोलिक व नैसर्गिक विविधतेनेही संपन्न आहे. पण या प्रत्येक बाबीचे काही गुण असतात तसे दोषही असतात. भारत हा मौसमी हवामानाचा प्रदेश असल्यामुळे पावसाळा, हिवाळा व उन्हाळा अशा तीन रूतुंचा हवामानाचा प्रभाव येथील वातावरणात निश्‍चितपणे पडलेला असतो. सध्या सुरु असलेल्या हिवाळ्यामुळे थंडीची लाट उत्तर भारतातूनच पसरते. गेल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रानेही थंडीच्या लाटेचा अनुभव घेतला. या थंडीच्या लाटेमुळे बिहारमध्ये नुकताच एका वनवधुचा मृत्यु झाल्याच्या बातम्या सगऴ्यांनी ऐकल्या. तसे तर उत्तर भारतात थंडीच्या लाटेत अनेकांचा बळी जातो. याचे मुख्य कारण म्हणजे अन्न, वस्ञ, निवारा या प्राथमिक व  मुलभूत गरजांपैकी कोणती एक गरज व्यवस्थित नसल्यामुळे हे मृत्यु घडतात. पोटात पुरेसे अन्न नसेल तर उर्जा तयार होत नाही परिणामी थंडीत आणखी भूक लागून अन्न पुरवठा न झाल्याने प्रतिकार शक्ती नष्ट होते. तर काही वेळा थंडीपासून बचाव करणारे वस्ञ व पांघरूण मिळत नसल्याने थंडीपासून बचाव होत नाही. यापेक्षा अन्य बाब म्हणजे, डोक्यावर घराचे छत नसले की थंडीपासून बचाव अवघड होतो. अशा उत्तर भारतात हे कमी की काय म्हणून आता दाट धुक्याची परिस्थिती निर्माण होत आहे.  दट धुक्यामुळे एकूण जनजीवनावर मोठा परिणाम होतो. बरेच रोजगार धुक्याची परिस्थिती निर्माण झाल्यावर ठप्प पडतात. त्यामुळे दैनंदिन रोजगारावर आपले पोट भरणार्‍या मजूर व श्रमिकांना दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण होते. ही धुक्याची स्थिती किती भयावह असते याची आपणास यावरुन निश्‍चित कल्पना येईल कि, उत्तर पूर्वेतून मुंबईला येणार्‍या बर्‍याच रेल्वे जवळपास दीड महिन्यापेक्षा अधिक काळ बंद राहणार आहेत यावरून ही कल्पना यावी. हवामानात आपणास पूर्णपणे बदल करता येत नाही. कारण निसर्गावर माणसाला मात करता येत नाही, किंबहुना तसा प्रयत्नदेखील मानवाने करू नये. अर्थात असा प्रयत्न सामान्य माणूस करत नाहीत. सर्वात महत्वाची गरज आहे ती म्हणजे या उत्तर भारतात माणसांना सर्व प्रथम थंडीपासून संरक्षण देण्यासाठी उर्जा निर्माण करण्याइतपत अन्न त्यांना मिळेल एवढे प्रयत्न करायला हवेत. दोन वेळ अन्न मिळण्याइतकी माफक अपेक्षा ठेवणे हा त्यांचा मानवी अधिकार आहे. या अधिकाराची जपणूक कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थेत मानवीय दृष्टीकोनातून व्हायलाच हवी. थंडीने कित्येक जणांचे बळी जातात पण त्यावर प्रस्थापित व्यवस्थेला चर्चा कराविशी वाटत नाही. कारण यात ज्यांचा बळी जातो ते सामान्यत: बहुजन समाजातील असतात. बहुजन समाजाचे कोणतेही प्रश्‍न या व्यवस्थेला आपले वाटत नाही ही बाब सर्वाधिक चिंतेची आहे. ही चिंता इतरांना वाटत नसेल तर बहुजन समाजाने त्यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपले प्रश्‍न आपण आपले मानल्या शिवाय ते सोडवण्याची उर्मी अंगी बाणत नाही. आतापर्यंत आमचा हिस्सा व्यवस्थेतील वरच्या समुहाने गिळंकृत केला आहे. यावर आपण कितीही ओरड केली तरी वरचा समाज काही जागा होत नाही. त्यामुळे अविचारी किंवा मागास विचारांचा समुदाय म्हणून त्यांच्यकडून अपेक्षा करणे गैर आहे. आता स्वावलंबी समाज बनून आपल्या समुहांसाठी आपणच प्रयत्न करुया.