Breaking News

महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजाने कर्ज देणार

मुंबई, प्रतिनिधी, दि. 25 - बचत गटांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांच्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार विचार करत असून आगामी अर्थसंकल्पात याची तरतूद करावी, अशी विनंती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना केली जाईल. त्यामुळे सरकारी तिजोरीवर साधारण  25 कोटी रुपयांचा भार पडेल, अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी काल दिली.
मुंबईतील वांद्रे येथे बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात 478 स्टाॅल उभारण्यात आले आहेत. पंकजा मुंडे यांनी दुष्काळग्रस्त बीड आणि उस्मानाबाद येथून आलेल्या महिलांच्या स्टॉल्सनाही भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, यंदा या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. प्रदर्शनात अनेक गोष्टी अत्यंत वेगळ्या आहेत. यात सोयाबीन काॅफी हा नवा प्रकार सादर केला आहे. यंदा आम्ही प्रथमच प्रदर्शनातील सर्वोत्कृष्ट दहा उत्पादने निवडून त्यांचे मार्केटिंग करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांवरही महिला बचत गटांना स्थायी जागा देण्याचा विचारही विभागाचा आहे. तसेच मॉलमध्ये बचत गटांसाठी जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णयही घेण्यात येणार असून याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो लवकरच सादर केला जाईल, असे पंकजांनी स्पष्ट केले.
ग्राम मार्ट तयार करणार : मेक इन इंडिया’ आणि मेक इन महाराष्ट्र’ च्या धर्तीवर मेक इन व्हिलेज’ योजना तयार करून ग्राम मार्ट तयार करून बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. ग्रामपंचायती आधुनिक होत असून यासाठी ई-रिटेलिंगचाही उपयोग करून घेतला जाईल. शहरांत बचत गटांना जागा दिल्यास त्यांना चांगला फायदा होईल, असे पंकजा म्हणाल्या.