Breaking News

संजय गांधी उद्यान परिसरातील टेकड्या खोदण्यास स्थगिती

मुंबई, प्रतिनिधी, दि. 21 - इंच इंच जागेत लाखो रुपये दडलेल्या मुंबईच्या जमिनी गिळंकृत करण्यासाठी वनजमिनी परिसरात सुरू असलेल्या कारवायांवर राष्ट्रीय हरित लवादाने ताशेरे ओढले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असलेल्या दिंडोशी व येऊरच्या टेकड्या तोडण्याचे काम स्थगित करण्याचे आदेश पुण्यातील हरित लवादाच्या शाखेने दिले. त्याचसोबत या कारवायांसंदर्भात वनविभागाला 10 फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात असलेल्या दिडोशी व येऊरच्या टेकड्यांचे सपाटीकरण करण्याचे काम गेली पाच वर्षे सुरू आहे. तेकड्या खोदणे, झाडांना होणारा पाणीपुरवठा थांबवून ती सुकण्याची व्यवस्था करणे याबाबत अनेकदा सामाजिक संस्थांनी आवाज उठवले होते. दिंडोशीच्या टेकड्या वनक्षेत्रात येत नसल्याचे सांगत वनविभागाने कानावर हात ठेवले होते. उद्यानाच्या परिसरात होत असलेल्या या विनाशामुळे पर्यावरणाची हानी होत असल्याचा दावा करत वनशक्ती संस्थेने राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली होती. दिंडोशी व ठाण्याच्या येऊर परिसरातील टेकड्यांना नाविकास क्षेत्र जाहीर करण्यात यावे, अशी त्यांची मागणी होती. गेल्या पाच वर्षांत टेकड्या तोडणे, जमिनीची पातळी एकसमान करणे, टेकड्यांवरून येणारे पाणी अडवून झाडे सुकवणे, यामुळे हिरव्यागार टेकड्यांचे ओसाड प्रदेशात रूपांतर होत आहे, असे वनशक्तीने अर्जात म्हटले होते. यासंदर्भात सुनावणीदरम्यान हरित लवादाने या दोन्ही परिसरातील टेकड्यांच्या खोदकामाला स्थगिती देत वनविभागाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे कॉलनी परिसरादरम्यान येत असूनही दिंडोशीच्या टेकड्यांना पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यात आलेले नाही. या क्षेत्राला पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात यावे यासाठीही हरित लवादासमोर याचिका प्रलंबित आहे. काही वर्षांपूर्वी दिंडोशीमध्ये दरड कोसळून संपूर्ण परिसरात चिखलाचा काही फूट थर झाला होता. टेकड्या तोडणे थांबवले नाही तर अशा प्रकारची घटना पुन्हा घडू शकेल. राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानंतर पर्यावरण रक्षकांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळाले आहे, असे वनशक्तीचे संचालक डी स्टॅलिन म्हणाले.