Breaking News

दलित विद्यार्थी आत्महत्येच्या निषेधार्थ विद्यापीठात निदर्शने


मुंबई, प्रतिनिधी, दि. 21 -  हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ मुंबईतील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी व तेलंगणच्या कर्मचार्‍यांनी मंगळवारी मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात निदर्शने केली. 
मुंबई विद्यापीठासह निर्मला निकेतन, सिद्धार्थ कॉलेज, विवेकानंद कॉलेज, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, पवई आयआयटी येथील आणि शिक्षण संस्थांचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. रिपब्लिकन पँथर्स, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन सारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनीही या आंदोलनात भाग घेतला.  विद्यापीठाच्या कलिना संकुलातील आंबेडकर भवनासमोर त्यांनी निषेधाच्या घोषणा दिल्या. सकुलातील अभाविपचे फलक आणि झेंडेही त्यांनी खाली उतरवले. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थ्यांना काढून टाकण्याच्या घटनेला अभाविप जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी आधी कुलगुरू आले नाहीत. त्यांच्याऐवजी उपकुलगुरू आले; मात्र नंतर आंदोलकांनी कुलगुरूंना भेट देण्यास भाग पाडले. नंतर त्यांना निवेदन दिले. 
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या 
रोहित वेमुलाच्या मृत्यूला जबाबदार असणार्‍यांवर एससी/एसटी ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करा. हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू, विद्यापीठ अभाविपचे अध्यक्ष, भाजपचे आमदार, खासदार यांच्यावरही गुन्हे दाखल करा. विद्यापीठ आणि सरकारने रोहितच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी. उर्वरित चार दलित विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घ्यावे. त्यांचे शोषण थांबवावे. हैदराबाद विद्यापीठासमोर निषेध नोंदवल्याने पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आणि अटक केलेल्या विद्यार्थ्यांना सोडावे.