एसटी कर्मचार्यांचा पुन्हा संपावर जाण्याचा इशारा
अहमदनगर । प्रतिनिधी । 30 - एसटी कर्मचार्यांसाठी लागू होणार्या नव्या वेतन करारात सातवा वेतन आयोग लागू न झाल्यास एसटीचे कर्मचारी बेमुदत संपावर जातील असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने राज्य शासनाला दिला आहे.
संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताठे यांनी याबाबत महामंडळ प्रशासन व परिवहन मंत्र्यांना निवेदन दिले असल्याची माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस व सचिव अकोलकर यांनी दिली. यासंदर्भात माहिती देतांना पुढे ते म्हणाले, 1 एप्रिल 2016 पासून लागू होणार्या नवीन कामगार करारासाठी मागण्याचा मसुधा संघटनेने व्यवस्थापनाकडे सादर केलेला आहे. मान्यता प्राप्त संघटनेने सादर केलेल्या मागणी मसुध्यामध्ये एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करावा, नवीन कामगार करार होईपर्यंत 25 टक्के अंतरीम वाढ लागू करावी, कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी, एसटी कामगारांना 1 महिन्यांचे वेतन सानुग्रह अनुदान म्हणून दिवाळीपुर्वी देण्यात यावे, मागील कामगार करारातील काही कर्मचार्यांच्या वेतनातील तफावती दूर करण्यात याव्यात, आदी प्रमुख मागण्या दिलेल्या आहेत. प्रशासनाने वाटाघाटी समितीची बैठक त्वरीत आयोजित करुन नवीन करार होईपर्यंत 31 मार्च 2016 च्या मुळ वेतनावर 25 टक्के अंतरीम वाढ देण्याचा निर्णय घेऊन 1 एप्रिल 2016 पासून त्याची अंमलबजावणी करावी, अशी आग्रही मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. शासन त्याच्या कामगारांना आर्थिक स्थितीचे कारण पुढे न करता आर्थिक बोजा स्विकारुन केंद्र शासनाप्रमाणे वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करते त्याचप्रमाणे एसटी कामगारांनाही शासकीय कर्मचार्यांप्रमाणे आर्थिक बोजा स्विकारुन शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा व सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीवर संघटना ठाम आहे. त्यामुळे अन्य उद्योगाप्रमाणे वेतन वाढ मिळण्यासाठी एसटी कामगारांना नवीन कामगार करारात सातवा वेतन आयोग लागू करणे आवश्यक असून तसे करण्यास प्रशासन, शासनाने नकार दिल्यास बेमुदत संप करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आल्याचे कडुुस यांनी सांगितले.