Breaking News

डॉ. दौलतराव आहेर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

 नाशिक/प्रतिनिधी। 21 -  दिवंगत माजी मंत्री  डॉ. दौलतराव आहेर यांच्या पार्थिवावर देवळा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे, महसूल मंत्री एकनाथराव खडसे, पालकमंत्री गिरीष महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन डॉ. आहेर यांना श्रध्दांजली अर्पण केली.
कै.डॉ.आहेर यांनी  गरीबांसाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेची पायाभरणी केली. साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हिताला त्यांनी प्राधान्य दिले. शेतकरी आणि गरीबांसाठी तळमळीने कार्य करणारा नेता राज्याने गमावला आहे, अशा शब्दात श्री.खडसे यांनी श्रध्दांजली अर्पण केली. शेतकर्‍यांसाठी कार्य करणारा अग्रणी नेता गमावला- गिरीष महाजन शेतकर्‍यांसाठी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून तळमळीने कार्य करणारा अग्रणी नेता राज्याने गमावला आहे, अशा शब्दात पालकमंत्री गिरीष महाजन यांनी कै. डॉ. दौलतराव आहेर यांना श्रध्दांजली अर्पण केली. ते म्हणाले, सहकार सोबतच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांनी गरीब माणसाच्या आरोग्याची काळजी होती. सामान्य माणसाला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य मंत्री असताना गरीबांना उपचारासाठी 50 हजार रुपये मदत देणारी जिवनदायी आरोग्य योजना त्यांनी सुरु केली. ते शिस्तीचे कडक असले तरी स्वभावाने मृदु होते आणि त्यांनी शेतकार्‍यांच्या हितासाठी तसेच साखर कारखान्याच्या उत्कर्षासाठी  संपूर्ण जिवन वाहिले.
कै.डॉ. आहेर यांनी शेतकरी आणि पाण्यासाठी संपूर्ण जीवनभर प्रयत्न केले, अशा शब्दात राज्यमंत्री श्री. भुसे यांनी  श्रध्दांजली अर्पण केली.  अंतिम संस्काराच्यावेळी आमदार बाळासाहेब सानप, अनिल कदम, सिमा हिरे, स्मिता कोल्हे, मविप्रच्या सरचिटणीस निलीमाताई पवार, विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाह, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर, पोलिस अधिक्षक संजय मोहिते आदींसह नागरिक उपस्थित होते.