Breaking News

जैन समाजाच्या भव्य शोभायात्रेने नगरकरांच्या डोळ्याचे पारणे फेडले


 अहमदनगर । प्रतिनिधी । 21 - जैनम जयंती शासनम्, आदेश्‍वर भगवान की जय च्या जय घोषात आणि भविकांच्या प्रचंड उत्साहात प्रथम तिर्थंकर आदेश्‍वर भगवान यांच्यासह 13 तीर्थंकारांच्या मुर्तींची शोभायात्र सकाळी 8.45 च्या मुहुर्तावर गुजरगल्लीतील जैन मंदिरातून निघाली आणि दुपारी दीड वाजेपर्यंत शहराच्या प्रमुख मार्गावरुन फिरन पुन्हा गुजरगल्लीतील जैन मंदिरात आली. कुठल्याही विशेष पोलिस बंदोबस्ताशिवाय नगरच्या इतिहासातील ही अतिशय भव्य अशी शोभायात्रा अतिशय शिस्तबद्ध रित्या चार साडेचार तास चालली.
पुज्य पंन्यास श्री दर्शनवल्लभ विजयजी महाराजांनी मांगलिक दिल्यानंतर सुुरु झालेल्या या मिरवणुकीने नगरकरांच्या डोळ्याचे अक्षरश: पारणे फेडले. तर प्रत्यय, आदेश्‍वर भगवानांची मुर्ती आपल्या रस्त्यावर, आपल्या दारात आल्यानंतर एकीकडे प्रचंड आनंद तर दुसरीकडे भाविकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. 
या शोभायात्रेचे महापौर अभिषेक कळमकर, आ.संग्राम जगताप यांच्यासह लक्ष्मीकारंजा येथे संकल्प युवक मंडळाचे नरेंद्र कुलकर्णी, नेत्रा सुभाष चौकात , नवीपेठेत जय आनंद महावीर युवक मंडळ, आडते बाजार - दाळ मंडईत व्यापारी संघटनांनी आणि भाविकांनी पुष्पवृष्टीने स्वागत केले.
मिरवणुकीतील सीमंधर-गरबा पथकाने नगरकरांचे लक्ष वेधून घेतले.तर नगरकरांचे लक्ष वेधून घेतले. तर नासिकच्या ढोल बाजासह गुजराथी, हिंदी, मराठी भक्तीगिते सादर करणार्‍या साज बँड पथकांनी शोभायात्रा श्रवणीय केली. एरवी मिरवणुक म्हंटली की, प्रचंड गदारोळ असाच अनुभव असलेल्या नगरकरांना ही नेत्रदिपक नृत्यरचना असलेल्या पथकांमुळे सुखद धक्का देऊन गेली.अग्रभागी असलेला गजराज सर्वांना सलामी देत होता. त्यामागे उंट 108 कलश घेतलेल्या भागिनी, तर घोड्यावर स्वार जैन ध्वज घेतलेली बालके कौतुकाचा विषय झाला होता. 13 तीर्थंकारांच्या प्रतिमा आकर्षक रथ आणि घोड्यागाड्या यात भाविक घेवून बसले होते. तर तीर्थंकर आदिनाथ भगवान यांची मुख्य प्रतिमा आकर्षक सुशोभित रथात विराजमान होती. नगरकरांनी अत्यंत पावित्र्यात आणि शिस्तबद्धरित्या निघालेल्या शोभायात्रेचे तोंडभरुन कौतुक केले. सुभाष मुथा यांनी मिरवणुकीचे संयोजन केले.जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाषशेठ मुथा, विश्‍वस्त चंपालाल मुथा (वर्धमानक्लॉथ), लालचंद कासवा, मणिकांत भाटे, राजेश शहा, दिनेश गांधी, किशोर भंडारी, प्रतिष्ठा महोत्सवाचे प्रचार प्रमुख यांच्यासह अ‍ॅड.ललित गुंदेचा, जैन युवक संघटनांचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी महिला आणि जैन समाजाच्या चारही संप्रदायांचा सहभाग यातून घडलेले जैन समाजाच्या ऐक्याचे उत्साहाचे आणि पावित्र्याचे दर्शन हे या मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य असल्याचे ऑल जैन्स आणि जैन मायनॉरिटी सेलचे निमंत्रक सुधीर मेहता यांनी सांगितले.