Breaking News

ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पी.एल.शिरसाठ यांचे निधन


नाशिक : प्रतिनिधी । 23 -  महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लक्ष्मण तथा पी.एल.शिरसाठ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
अकोला शहरात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शिरसाठ यांनी गेल्या 25 वर्षांपासून तळागाळात काम करणार्‍या ग्रामीण भागातील सामान्य पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी संघर्ष केला आणि सरकारला दखल घेणे भाग पाडले. पत्रकार संघटनांच्या इतिहासात ग्रामीण भागातील पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून शिरसाठ यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे वेगळे स्थान निर्माण केले होते. 5 वर्षांपूर्वी आझाद मैदानावरील जवळपास 2 हजार पत्रकारांनी पी.एल.शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली केलेले आंदोलन असो नाहीतर गेल्या हिवाळी अधिवेशनात काढलेला नागपूर मोर्चा असो प्रत्येक वेळी या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली, हेच शिरसाठ यांच्या नेतृत्वाचे यश मानले जाते.