Breaking News

वसंतदादा कारखान्याच्या राखेविरुद्ध सुधार समिती लढा उभारणार


सांगली. 13 - वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या धुराड्यातून बाहेर पडणार्‍या राखेमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. कारखान्याच्या या प्रदूषणाविरुद्ध जनआंदोलन उभारण्याचा निर्णय जिल्हा सुधार समितीने सोमवारी अभयनगर येथे पार पडलेल्या नागरिकांच्या बैठकीत घेतला. 
राखेच्या प्रश्‍नावर सुधार समितीच्यावतीने येथील अभयनगर येथे बैठक पार पडली. या बैठकीस संजयनगर, अभयनगर, यशवंतनगर, पंचशीलनगर, चिंतामणीनगर, शालिनीनगर, अहिल्यानगर येथील नागरिक उपस्थित होते. यावेळी अँड. अमित शिंदे म्हणाले की, कारखाना परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून नागरिकांना राखेचा त्रास होत आहे. या प्रदूषणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. या प्रदूषणामुळे नागरिकांच्या डोळे व श्‍वसनाच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांच्या घरादारात, अंगणात सर्वत्र राखेचे थरच्या थर साचत आहेत. राख डोळ्यात जाऊन अपघातही घडत आहेत. या भागातील नागरिकांनी सुधार समितीकडे संपर्क साधला होता. त्यानुसार आता याप्रश्‍नी आंदोलन उभारण्यात येईल.
वसंतदादा कारखान्याची राख 7 ते 8 किलोमीटर परिसरात पसरत असल्याचा आमचा अंदाज होता, परंतु याचा अभ्यास करताना लक्षात आले की, सांगलीच्या जवळजवळ सर्वच भागात ही राख कमी-अधिक प्रमाणात पडते. त्यामुळे संपूर्ण सांगली, मिरज आणि कुपवाडकरांच्या आरोग्याचाच गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. याविरुद्ध आता सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे. समितीचे कुपवाड शहरप्रमुख मुनीर मुल्ला म्हणाले की, रस्त्यावरच्या लढाईबरोबरच आपण न्यायालयीन लढाईसुद्धा लढणार आहोत. वेळप्रसंगी हरित न्यायालयातही आपण दाद मागू. यावेळी नागरिकांनीही आपल्या समस्या मांडत आंदोलनाला पाठिंबा दिला. 
बैठकीस समितीचे रवींद्र चव्हाण, प्रवीण शिंदे, प्रा. आर. बी. शिंदे, रामदास कोळी, सुरेश टेंगले, अँड. राजू यमगर, भास्कर मोहिते, राजकुमार पेडणेकर, श्रीराम मालपाणी, चिंतामणी लकडे व इतर नागरिक उपस्थित होते.