डफळापुरातील एकास सक्तमजुरी
सांगली. 13 - पत्नी माहेरी गेल्याच्या रागातून स्वतःच्या सात वर्षाच्या मुलीस विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या डफळापूर (ता. जत) येथील सलीम अब्बास मुजावर (वय 41) यास दोषी धरुन पाच वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्रन्यायाधीश डी. जी. धुमाळ यांनी सोमवारी हा निकाल दिला.
सलीमचा खानापूर येथील जहिदा यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना अंजूम (7), हजरत (5), अरमान (3), अशी तीन मुले झाली. सलीमला दारुचे व्यसन होते. तो जहिदाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा, तुला गळा दाबून मारतो, अशी नेहमी धमकी द्यायचा. त्याचा छळ वाढतच गेल्याने जहिदा मुलांना घेऊन खानापूर येथे माहेरी राहण्यास गेली होती. त्यानंतर सलीम तिच्याकडे घटस्फोट मागू लागला. नातेवाईकांनी मध्यस्थी करुन त्यांचा संसार पुन्हा जोडल्याने, जहिदा डफळापूरला पुन्हा आली. पण सलीमच्या वर्तणुकीत काहीच फरक पडला नाही,
4 ऑगस्ट 2012 रोजी सलीमने जहिदाला शिवीगाळ करुन मारहाण केली. तुला आता सोडतच नाही, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जहिदा मुलांना सोडून तेथून पळून गेली. याचा सलीमला राग आला. त्या रागातून त्याने मुलगी अंजूमला तापाचे औषध असल्याचे सांगून विष पाजले होते.
सरकारतर्फे या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले होते, यामध्ये फिर्यादी जहिदा मुजावर, मुलगी अंजूम, डॉ. हबीब नदाफ, पंच साक्षीदार सुरेश नांगरे, तपास अधिकारी सुरेश नागरे, यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील सुरेश भोसले यांनी या खटल्याचे काम पाहिले. निकालाकडे डफळापूरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले होते.