Breaking News

ढाब्यावर थांबलेल्या एसटीमधील साडेचौदा लाखाचे दागिने लंपास

सातारा, 1 -  पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर खोडद (ता. सातारा) येथील ढाब्यावर उभ्या असलेल्या एसटीमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे साडेचौदा लाख रुपये किमतीचे दागिने पळविले. 
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर येथील न्यू इंडिया अंगडिया सर्व्हिसेस नावाच्या कुरिअर कंपनीत ते काम करतात. ते नेहमीप्रमाणे कुरिअरच्या बॅगा घेऊन ते आजरा-मुंबई एसटीने भुलेश्‍वर-काळंबादेवीला (मुंबई) निघाले होते. त्यांच्याकडे दोन बॅगा होत्या. त्यापैकी एका बॅगेत 11 लाख रुपये किमतीचे सोन्याचे व साडेतीन लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने असा सुमारे साडेचौदा लाख रुपयांचा ऐवज होता. दुसर्‍या बॅगेत सुमारे 40 किलो वजनाची चांदी होती. या दोन्ही बॅगा त्यांनी वाहकाच्या मागच्या सीटखाली ठेवल्या होत्या. रात्री सव्वाअकराच्या सुमारास महामार्गावरील एसटी खोडद येथील हॉटेल सिमरनजीत ढाबा येथे जेवणासाठी थांबली. यावेळी बोबडे यांच्यासह अनेक प्रवासी जेवणासाठी उतरले. त्यानंतर त्यांनी एसटीत येऊन सीटखाली पाहिले असता साडेचौदा लाख रुपयांचा सोने-चांदीचा ऐवज असणारी बॅग गायब असल्याचे लक्षात आले. बोबडे यांनी ही माहिती मोबाईलवरुन मालक दशरथ बोबडे यांना सांगितली. त्यानंतर राजेंद्र दत्तात्रय बोबडे (वय 40, रा. घाडगेवाडी, ता. फलटण, हल्ली रा. सावित्री गल्ली, कोल्हापूर) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अधिक तपास सपोनि विश्‍वास कदम करत आहेत.