Breaking News

शिक्षकच समाजाला आदर्श देवू शकतातः डॉ. शिंगणे


बुलडाणा (प्रतिनिधी), 11 - आजच्याकाळात निस्वार्थपणे व प्रामाणिकपणे शिक्षकांनी योगदान दिल्यास लोकजीवनात शिक्षणासह संस्काराची एक अनोखी आदर्श रीत निर्माण होवू शकते. ज्यायोगे माणसाच्या आयुष्याला सुंदर असा आकार देता येतो. व जीवन समृध्द बनते. बळीराम गुरुजींनी शिक्षकी पेशात विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या मुलाबाळांवर संस्कार करुन समाजजीवनात एक आदर्श कुटूंब निर्माण केले. आण्णाजी हाडाचे शिक्षक असून ते दिलदार मनाचा उत्तुंग व्यक्तित्वाचा कळस आहे. अशा या व्यक्तित्वाचा गौरव माझ्या हस्ते होतो. ही एक चांगली गोष्ट मी समजतो. आण्णाजी तुम्ही शतायुषी व्हा अशा शुभेच्छा देत माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी गौरवोद्गार काढले.
मेरा बु.ता.चिखली येथील वारकरी व गावकरी मंडळीच्या वतीने बळीराम पडघान यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसा निमित्त आयोजित गौरव सोहळ्यात डॉ.राजेंद्र शिंगणे बोलत होते. प्रसंगी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, आ.राहुल बोंद्रे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, आमदार शशिकांत खेडेकर,  जि.प.चे उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर, कुउबास समिती चिखली चे सभापती विष्णु पाटील कुलसुंदर, संचालक 
रुपराव सावळे, सचिन शिंगण, जि.प0सदस्य अशोक पडघान, माजी शिक्षण सभापती विनायक पडघान, सत्तार पटेल, प्रा.डॉ.एस.पी. भालके, सरपंच अर्चना पडघान, सत्यपाल महाराज आदि उपस्थित होते.
अमृत महोत्सवानिमित्त सत्कारमुर्ती बळीराम पांडुरंग पडघान, सौ.चंद्रप्रभा बळीराम पडघान यांचा 
डॉ.राजेंद्र शिंगणे व रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी सत्कारमुर्तीचा सत्कार केला प्रसंगी आमदार राहूल बोंद्रे यांनी शुभेच्छा देतांना बळीराम गुरुजींनी पंचक्रोशीत आपल्या कुटूंबात 
शिक्षणाच्या माध्यमातून संस्काराच्या सहाय्याने परिवर्तन घडविले. ही आदर्श अशी घटना असल्याची भावना 
व्यक्त केली. या कार्यक्रमासोबतच भास्करराव पडघान, सौ.कमल भास्कर पडघान, रामराव खेडेकर, अंत्री 
खेडेकरच्या पहिल्या महिला सरपंच सौ. मीनाताई खेडेकर व दिलीप खेडेकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार 
करण्यात आला. अण्णाजींनी आपल्या सेवाकार्यातुन प्रतिकुलतेवर मात करीत कुटूंबासह गावाचे नाव मोठे केले. गुरुजींनी आपल्या मुलांवर केलेल्या सुसंस्कारातून अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील व त्यांच्या भावंडानी लोकजीवनात आई-वडीलांचे नाव पुढे नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. आज महाराष्ट्रभर परिचीत असणारे अ‍ॅड.पुरुषोत्तम पाटील निरपेक्ष वृत्तीने सामाजिक बांधीलकीतून असे उपक्रम सातत्याने घेत असतात. मेर्‍याच्या इतिहासात अविस्मरणीय असा हा सोहळा असल्याची भावना व्यक्त करीत समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज राष्ट्रीय व सामाजिक कार्य सेवाभावाने वाढवून समाज बांधणीचे काम करीत असल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र भुषण हा पुरस्कार शासनाने देवून त्यांचा गौरव केला पाहिजे असे मत व्यक्त केले.  कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ, छ.शिवाजी महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापुजनाने व दिपप्रज्वलनाने करण्यात आली. अ‍ॅड.पुरुषोत्तम पाटील यांनी प्रास्ताविक करुन मान्यवरांचे स्वागत. पं.स.सदस्य अमोल पडघान यांनी केले. संचलन रविंद्र पडघान यांनी केले.