Breaking News

महाराष्ट्रात ज्ञानसाधनेला अनन्यसाधारण महत्व

 नाशिक/प्रतिनिधी। 31 - राज्यात शिक्षणाची ज्ञानगंगा प्रवाहित करण्यासाठी लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले अशा थोर व्यक्तींनी महत्वपूर्ण कार्य केले असून येथे आर्थिक उन्नतीपेक्षा ज्ञानसाधनेला अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सिन्नर येथील आदर्श इंग्लिश स्कूलच्या नुतन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्षा अश्‍विनीताई देशमुख, संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार प्रतापदादा सोनवणे, सरचिटणीस निलिमाताई पवार, ड. नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.
राज्यामध्ये शिक्षणाची क्रांती होण्यात अनेक विभुतींनी आपले जीवन वाहून घेतल्याचे सांगतांना श्री. देसाई म्हणाले, शिक्षण क्षेत्रातील धुरीणींनी आणलेली ज्ञानगंगा पुढे नेण्यासाठी नंतरच्या काळात अनेक व्यक्ती आणि संस्थांनी मोठे कार्य उभारले.  ज्ञानाचा प्रकाश गावोगावी पोहोचविणार्‍या या दिपस्तंभांमुळे  अनेकांचे जीवन समृद्ध झाले.   विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी अशा थोर व्यक्तींचा आदर्श समोर  ठेवला तर ते  जीवनात यशस्वी  होतील, असे त्यांनी सांगितले.
 पुर्वी फक्त मोठ्या गावात आणि  शहरापर्यंत मर्यादीत असलेले शिक्षण  ग्रामीण भागात आणि समाजाच्या तळागाळापर्यंत विस्तारले  गेल्याचे सांगून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मराठा विद्या प्रसारक या संस्थेने शिक्षण प्रसारासाठी केलेल्या कार्याचा त्यांनी विशेष उल्लेख केला, कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती  विद्यार्थ्यांना देतांना अशा कार्यातून आदर्श घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 
सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहाचे उद्घाटन
सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या कै.वसंतराव देशपांडे सभागृहाचे उद्घाटन उद्योगमंत्री देसाई यांचे हस्ते झाले. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, नगराध्यक्षा अश्‍विनीताई देशमुख, वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत आदी उपस्थित होते. वाचकांची आवड व विषय काळानुरुप बदलेले आहेत. पण जनतेमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यात वाचनालयांचा मोठा वाटा असून ज्या गावांमध्ये चांगले वाचनालय आहे अशी गावे सुसंस्कारीत झाली आहेत, असे श्री.देसाई याप्रसंगी म्हणाले.
उद्योगमंत्री सुभाष देसाई उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा
सिन्नर येथे विविध कार्यक्रमांसाठी आगमन झाल्यानंतर श्री. देसाई यांनी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन चर्चा केली. यामध्ये उद्योजकांची नाशिक येथील संघटना निमा व सिन्नर येथील संघटनांचे प्रतिनिधी होते. याप्रसंगी उद्योगांसाठी असणारे वीजचे दर, सिन्नर औद्योगिक वसाहतीचा पाणी पुरवठा आणि प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वे मार्ग आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, निमाचे अध्यक्ष संजीव नारंग, उद्योजक आशिष नहार आदी उपस्थित होते.