Breaking News

जनतेला दिलेल्या आश्वासनांची वर्षातच पूर्तता : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने युवा नेते आशुतोष काळे यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची एकाच वर्षात पूर्तता केली आहे, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी केले. 

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण योजनेअंतर्गत सभापती अनुसया होन यांनी युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करून चांदेकसारे येथील महिलांना घरघंटी (घरगुती पिठाची गिरणी) व अपंगाना तीन चाकी सायकलसाठी प्रत्येकी ७ हजार रुपयांच्या अनुदान वाटपप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बाळासाहेब खरात होते. 

यावेळी अॅड. राहुल रोहमारे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सुधाकर होन यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन माजी सरपंच मतीन शेख यांनी केले. यावेळी सभापती अनुसया होन, अॅड. राहुल रोहमारे, काळे कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, रोहिदास होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, भीमा होन, दादासाहेब होन, माजी सभापती आशा खरात, ग्रामपंचायत सदस्य युनुस शेख, अजित होन, माणिक खरात, दिपाली होन, रंजना होन, ग्रामसेवक सुकेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शंकरराव चव्हाण यांनी आभार मानले.