तळेगाव मळे येथे बस थांबवा अन्यथा रास्तारोको ; सरपंच क्षिरसागर यांचा इशारा
कोपरगाव ता. प्रतिनिधी
तालुक्यातील तळेगाव मळे येथे गेल्या कित्येक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एकही बस थांबत नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेत शिक्षण स्वप्न पूर्ण करावे लागत आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांची खासगी वाहनाने जाऊन शिक्षण घेण्याची परिस्थिती नाही, अशा विद्यार्थ्यांना मात्र शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. सरपंच सचिन क्षिरसागर यांनी यासंदर्भात आगार प्रमुख अभिजित चौधरी व वैजापूरचे आगार प्रमुख एच. बी. नेरकर यांना नुकतेच निवेदन दिले. या मार्गावर सुरु असणा-या बस तळेगाव मळे येथे थांबाव्यात. अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे हे १ हजार ६६० लोकसंख्या असलेले कोपरगाव, वैजापूर, नगर आणि औरंगाबादच्या सीमेवरील गाव आहे. या गावापासून कोपरगाव अंदाजे २० तर वैजापूर १० किलोमीटर अंतरावर आहे. या गावातून दररोज कोपरगाव व वैजापूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी त्याचबरोबर शहरातील सरकारी व खाजगी दवाखान्यात उपचारासाठी ज्येष्ठ नागरिकांना जावे लागते. परंतु या मार्गावरून जाणारी एकही बस याठिकाणी थांबत नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसची वाट पाहत पाहत शेवटी कंटाळून विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक आपला प्रवास अनेक दिवसांपासून खासगी वाहनाने करीत आहे. त्यामुळे नियमितपणे शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांचे व ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहेत. यामुळे या सर्वच संबंधितांना आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
याप्रसंगी उपसरपंच रघुनाथ टुपके, आबासाहेब डुकरे, भरत टुपके, नितीन वाकचोरे, योगेश जाधव, गणेश वैद्य, मिलिंद मोकळ, नितीन ऊकिरडे, अभिजीत टुपके, आशिष मोकळ, साहिल मोकळ आदी उपस्थित होते.