Breaking News

चाकूचा धाक दाखवून वृद्धेला लुटले


अज्ञात दुचाकीस्वाराने चाकूचा धाक दाखवून वयोवृद्ध महिलेला लुटल्याची घटना आज भर दुपारी दोडामार्ग तालुक्यात भेडशी येथे घडली. सोनसाखळी चोराने सुमारे एक लाख रुपयांची सोन्याची माळ हिसकावून नेली. आंबेली केळीचे टेंब येथे वायंगणतडला जाण्यासाठी एसटी ला उभ्या असलेल्या प्रभावती मधुकर गवस यांना लिफ्ट देतो असें सांगून आपल्या स्कूटर वरुन नेणाऱ्या दुचाकीस्वाराने भेडशीतील पर्यायी रस्त्यावर नेऊन लुटले.सुनसान रस्त्यावर स्कूटर थांबवून त्याने तिच्या गळ्यातील तीन तोळयाची सोन्याची माळ हिसकावून घेतली आणि चाकूचा धाक दाखवून कानातील कुडी काढून घेण्याचा प्रयत्नही केला; मात्र तिने दोन्ही हाताने आपले कान पकडून ठेवल्याने तिला ढकलून देत त्याने पळ काढला. प्रभावती गवस आंबेली केळीचे टेंब येथे भाऊ रामदास गवस (बाबी पालकर) यांच्याकडे आल्या होत्या. तिथेच दुपारी जेऊन त्या वायंगणतड येथे भाचा दयानंद नाईक यांच्याकडे जाण्यासाठी बस थांब्यावर थांबल्या होत्या.तेवढ्यात दोडामार्गच्या दिशेने एकजण काळ्या स्कूटरने आला.त्याने प्रथम दोनदा घिरट्या मारल्या आणि नंतर त्यांना कुठे जायचे आहे असे विचारले.आपण वायंगणतडला जात असल्याचे सांगताच त्याने आपणही तिकडेच जातो, कुणाकडे जाणार असे विचारले.त्यावेळी दयानंद नाव घेताच मी ओळखतो, थेट दरवाज्यात नेऊन सोडतो असें सांगितले. नाही-होय करता करता त्या दुचाकीवर बसल्या. मात्र त्याने सरळ दामोदर मंदिराजवळील पुलावरून न नेता तेथील कॉजवे पाण्याखाली असताना वापरल्या जाणाऱ्या पर्यायी रस्त्याला गाडी वळवली. पुलावर पाणी नसताना त्याने पर्यायी रस्त्याला नेल्याने त्यांनी कुठे जातोस, हा रस्ता नव्हे असे सांगताच इकडून नेतो असें सांगितले आणि वेग वाढवला. आपण आता उडी मारणार असे त्यांनी सांगताच त्याने पुलाच्या अलिकडील गर्द झाडीतून जाणाऱ्या रस्त्यात दुचाकी थांबवून माळ हिसकावून त्यांना गाडीवरून खाली ढकलून त्याने पळ काढला. चाकूचा धाक दाखवून कुडी दे नाहीतर कान कापीन असे सांगून कुडी काढून घेण्याचा त्याचा प्रयत्न मात्र त्यांच्या प्रसंगावधानाने असफल झाला. त्यानंतर त्या तेथून सुमारे सहा किलोमीटर रडत आणि चालत पुन्हा आंबेली केळीचे टेंब येथे पोचल्या. त्यानंतर दयानंद नाईक, प्रथमेश सावंत.गवस यांचा पुतण्या आणि प्रभावती गवस सायंकाळी पोलिस ठाण्यात आल्या. त्यांनी चोरीची तक्रार दिली.चोरट्याने रेनकोट आणि फूल हेल्मेट घातल्याचे त्यांनी सांगितले.त्यावरून पोलिसांनी नाकाबंदी केली तसेच घटनास्थळाची पाहणी केली.