Breaking News

नाशकात खडकाळी खून प्रकरणी चौघांना जन्मठेप


शहरातील खडकाळी येथे उरुसानिमित्त ठेवलेल्या नियाजच्या (प्रसाद) भोजनावेळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून एकाचा चाकूने वार करून खून करणार्‍या चौघा आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ जी़ गिमेकर यांनी आज जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़. आरोपी हुजेर रफिक शेख (19), मुक्तार उर्फ राज जाकिर खान, मोहसिन जावेद खान व शहबाज मजिद पठाण (सर्व रा. खडकाळी) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 18 एप्रिल 2016 रोजी रात्रीच्या सुमारास खडकाळीमध्ये ही घटना घडली होती़ तौफिक मोहम्मद हनिफ शेख (22, रा़ खडकाळी) याचा यामध्ये खून झाला होता. खडकाळीत ख्वाजा गरीब नवाज उरुसानिमित्त 14 एप्रिल 2016 रोजी नियाज (प्रसाद) होता़ यावेळी भोजनातील पंक्तिमध्ये सैफ मोहंमद हनिफ शेख व आरोपी हुजेर रफिक शेख (19) यांच्यामध्ये वाद झाले होते. यानंतर सैफने भद्रकाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविला होता़ या घटनेनंतर चार दिवसांनी 18 एप्रिल रोजी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास सैफचा भाऊ तौफिक हा दुकानातून अंडी घेऊन येत असताना आरोपी हुजेर रफिक शेख, मुक्तार उर्फ राज जाकिर खान, मोहसिन जावेद खान व शहबाज मजिद पठाण यांनी कुरापत काढून जीन मंजिक येथे त्यास अडविले़ यानंतर मुक्तार व मोहसिन यांनी तौसिफचे हात धरले व हुजेरने हातातील चाकूने भोसकून त्याचा खून केला,़तर शहबाजने वाचविण्यासाठी येणार्‍या नागरिकांना प्रतिबंध केला़ यानंतर चौघेही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या प्रकरणी सैफ शेखच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़. या गुन्ह्याचा तपास भद्रकाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गोरख जाधव व सहायक पोलीस उपनिरीक्षक शेळके यांनी केला होता. त्यांनी या प्रकरणातील साक्षी पुरावे गोळा करत, दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायाधीश गिमेकर यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात जिल्हा सरकारी वकील अजय मिसर व सरकारी वकील रविंद्र निकम यांनी 17 साक्षीदार तपासून न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर केले़ यामध्ये शवविच्छेदन करणारे डॉक्टर, प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायाधीश गिमेकर यांनी या चौघांना दोषी ठरवून जन्मठेप व प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला,़तसेच दंडाची रक्कम मयत तौफिक शेखच्या कुटुंबियांना देण्याचे आदेश दिले़ . दरम्यान, न्यायालयात निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी झाली होती तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.