गोसावी समाजाचा तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा
जामखेड / श. प्रतिनिधी
राईनपाडा घटनेच्या निषेधार्थ नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने दि. 5 जुलै रोजी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत तहसीलदार व पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 1 जुलै रोजी राईनपाडा ता. साक्री जि. धुळे येथे पोरं धरी अफवेमूळे अमानुषपणे झालेल्या मारहाणीत नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या पाच निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यांची कसलीही विचारपुस व कसलीही खात्री न करता, केवळ संशयावरून त्यांच्यावर प्राण घातक हल्ला करून ठार मारले. माणूसकीला काळीमा फासणार्या या घटनेच्या निषेधार्थ जामखेड येथे नाथपंथी डवरी गोसावी समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा नाथनगर-तपनेश्वर रोड ते खर्डा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पेठेतून लोकमान्य वाचनालय कोर्ट रोडने तहसील कार्यालयावर जाईल. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हाध्यक्ष भिमराव चव्हाण, अनिल सावंत, साहेबराव शिंदे, संतोष चव्हाण, सूभाष सावंत, शंकर शिंदे, संतोष शेगर, अजिनाथ शिंदे, मोहन चव्हाण, भाऊराव चव्हाण आदिंच्या सह्या आहेत.