Breaking News

पावसाच्या लहरीपणामुळे ‘जिरायत’ भाग कोमात!


अहमदनगर / बाळासाहेब शेटे

राज्यातील काही भागात धुवांधार तर काही भागांत एक थेंबही नाही, पावसाचा असा लहरीपणा आजकाल सगळीकडे पहायला मिळत आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत दमदार पाऊस झाला नाही. परिणामी उत्तरेतील जिरायती भागातील शेती कोमात गेल्याची चिन्हे आहेत. या भागात खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या असल्या तरी पाऊस नसल्याने अनेक ठिकाणी दुबार पेरण्यांचे संकट घोंगावत आहे. 

जून महिन्यात पावसाला दमदार सुरुवात झाली. मात्र, नंतर पावसाने दडी मारल्याने अनेक ठिकाणी खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाच्या भरवशावर पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ १८ टक्के एवढाच पाऊस झाला अाहे. त्या आधारावर ३० टक्के खरिपाच्या पेरण्या झाल्या. मृग नक्षत्रात पावसाने वेळेवर हजेरी लावली. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याचे हवामान खात्यानेही भाकित वर्तविले होते. मध्यंतरी झालेल्या एक-दोन दमदार पावसानंतर जमिनीत चांगली ओल निर्माण झाली. त्यावर बळीराजाचे पेरणी केली खरी. मात्र वरुणराजाने डोळे वटारल्याने केलेली मशागत, बियाणांचा खर्च आणि यातून चांगल्या पिकाची आशा या सर्वांवरच वरुणराजाची वक्रदृष्टी झाल्याचे पहायला मिळत आहे.

जिल्ह्याच्या दक्षिण आणि उत्तर भागात बागायती आणि जिरायती अशी शेती आहे. ज्या भागात पावसाची कृपा झाली आहे, त्याचप्रमाणे जेथे पाटपाण्याचा शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतो आहे, तो भाग सध्या जोमात दिसत आहे. मात्र याउलट परिस्थिती असलेला भाग केवळ पावसाअभावी कोमात जाण्याची स्पष्ट संकेत निसर्गाकडून मिळत आहेत. जिल्ह्याच्या उत्तर भागातील राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहता, शिर्डी या भागांत बळीराजाला पावसाची मोठी प्रतिक्षा आहे. मात्र पावसाने दडी मारल्याने या भागातील शेतकरी हवालदिल झाल्याचे पहायला मिळत आहे. 

सोशल मिडियावर जागा नाही

पावसाने दडी मारली असून बळीराजा प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. काही ठिकाणी कर्ज वाढल्याने शेतकरी आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेत आहेत. सोशल मिडिया मात्र याविषयी कमालीचा अनभिज्ञ दिसत आहे. फेसबुक आणि व्हाट्सअपवर बळीराजाच्या कथा आणि व्यथा मात्र कुठेच दिसून येत नाही. शेतकऱ्यांची मुले सोशल मिडियावर खूप कमी असल्याने की काय, शेती आणि शेतकऱयांच्या समस्यांना सोशल मिडियावर लांब लांबपर्यंत जाग मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.