Breaking News

जिद्द आणि मेहनतीने हमखास ध्येयप्राप्ती : दिघे


राहाता प्रतिनिधी

नकारात्मकता बाजूला सारत सकारात्मक ऊर्जा घेऊन जिद्द आणि मेहनतीने ध्येयपूर्तीकडे वाटचाल केली तर ध्येयप्राप्ती करून जीवनात हमखास यशस्वी होता येते, असे प्रतिपादन शिर्डी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी केले. 

साई निर्माण प्रतिष्ठानसंचलित श्री साई निर्माण कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय प्रवेशाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेले अखिलेश बोंबे, महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विजय कोते, उपाध्यक्ष पंकज लोढा कार्यकारी अधिकारी डाॅ. श्रीरंग झावरे, प्राचार्य विकास चौधरी, संस्थेचे विश्वस्त अशोक गोंदकर , जगन्नाथ गोंदकर, मुन्ना शहा, मंगेश त्रिभुवन, संजय गोंदकर, धनंजय साळी, दशरथ गव्हाणे, डी. डी. पवार, किरण आहेर, ताराचंद कोते, रामा गागरे, पत्रकार नवनाथ दिघे, पत्रकार सागर सावकार आदींसह इंग्लिश मिडियम स्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका, पालक आणि कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मुख्याधिकारी दिघे म्हणाले, माझे शिक्षण ग्रामीण भागात झाले आहे. अधिकारी बनण्याचे स्वप्न होते. मात्र त्यासाठी काय करावे लागते, हे माहीत नव्हते. पुण्याला जाऊन अकॅडमी जाईन केली आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून मुख्याधिकारी बनलो. जीवनात नकारात्मक गोष्टींना स्थान देऊ नका. नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा घेऊन ध्येयपूर्ती कडे वाटचाल करा, यश तुमच्यासोबत असेल.

पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झालेले बोंबे म्हणाले, तुम्ही सर्व विद्यार्थी भाग्यवान आहात. साईनिर्माण सिनियर कॉलेजसारखे सुसज्ज व सुविधायुक्त असलेले कॉलेज आणि उच्चशिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग तुम्हाला लाभला आहे. या संधीच तुम्ही सोने करून घेतले पाहिजे. आम्ही अगदी खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले. मात्र ध्येयापासून केव्हाही दुर्लक्षित झालो नाही. संकटांना जरूर सामोरे गेलो. मात्र यश प्राप्त केले. साई निर्माण ग्रुप संचलित साई निर्माण सीनियर महाविद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष विजय कोते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.