‘स्मॉल वंडर्स’च्या चिमुकल्यांनी काढली आकर्षक दिंडी
राहुरी प्रतिनिधी
येथील स्मॉल वंडर्स प्रि प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या आकर्षक दिंडीने स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. सालाबादप्रमाणे याही वर्षी श्रीक्षेत्र सरलाबेटचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघणार्या पंढरपूर पायी दिंडीचे खडांबे बुद्रुक, जठारवस्ती येथे स्वागत करण्यात आले. यावेळी स्मॉल वंडर्स प्रि प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रूख्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर आदींच्या वेशभूषेत दिंडी काढून वारकर्यांचे लक्ष वेधले. यावेळी अक्षय कर्डिले, रावसाहेब साबळे, सुरसिंग पवार, मच्छिंद्र कोहकडे, बाळासाहेब जठार, बाचकर, समीर पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. दिंडीतील वारकर्यांसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर विठूनामाच्या जयघोषात शेकडो वारकर्यांची ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.
