आयुष्यात घेण्यापेक्षा देणे महत्वाचे - धोंगडे, ग्रामपंचायतीकडून जि. प. शाळेस संगणक भेट
जीवन जगत असताना प्रत्येकाला काहीतरी द्यायचे आहे. घेणार्यापेक्षा देणार्याला प्रतिष्ठा मिळते. म्हणूनच आयुष्यात घेण्यापेक्षा देणे महत्वाचे आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत निधीतुन येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेस तसेच सोंगाळवाडी शाळेस प्रत्येकी एक संगणक भेट दिला. याप्रसंगी येथील केंद्र शाळेचे मुख्याध्यापक रमेश धोंगडे यांनी प्रतिपादन केले. यावेळी ग्रामसेवक गौतम जानेकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव, माधव बोर्हाडे, वाळीबा लगड, देवराम बगनर, दिपक पथवे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मुख्याध्यापक रमेश धोंगडे म्हणाले की, चांगला गुरू तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो. पण त्यातुन यशाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्याला स्वतःलाच चालावे लागते. उमेद, विश्वास आणि कष्ट हे ज्यांच्याजवळ आहे ते कधीच अपयशी होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामसेवक गौतम जानेकर यांनी लहान मुलांना संगणकाची आवड निर्माण व्हावी तसेच डिजीटल शाळा हा उद्देश समोर ठेवून, चांगल्या लोकांच्या फक्त संगतीत जरी राहिले तरी, नकळत आपले विचार देखील स्वच्छ होत असतात. तसेच स्मृतीतुन कृतीत आणि कृतीतून समाधानात जी दिसते ती जाणीव असल्याचेही ते म्हणाले. ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव यांनी, चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतुट विश्वास ठेवतात. त्यासाठी मनाशी बाळगलेले स्वप्न पुर्ण झाल्याशिवाय संघर्षाचे मैदान सोडू नका असे आवाहन त्यांनी केले. शेवटी ग्रामपंचायत कर्मचारी देवराम बगनर यांनी उपस्थितांचे आभार मानले.