Breaking News

रखडलेल्या पाणीपुरवठा योजना तत्काळ पूर्ण करा- लोणीकर

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेतील कामाच्या आढावा बैठकीत निर्देश राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम व मुख्यमंत्री पेयजलयोजनेतील रखडलेल्या योजना त्वरीत पुर्ण करा, तसेच योजनेचे काम पुर्ण करण्यास विलंब लावणा-या संबंधीत अधिकारी व कंत्राटदारांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज,बुधवारी दिले. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातर्फे तेलंगखेडी परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेतील कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी लोणीकर यांनी नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणा-या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व मुख्यमंत्री पेयजल योजनेंच्या कामांचा आढावा घेतला. या योजनांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला असून या योजना त्वरीत पुर्ण करणा-याकडे अधिका-यांनी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. यावेळी लोणीकर यांनी या जिल्ह्यांमधील काही रखडलेल्या योजनांबाबत नाराजी व्यक्त करून वरिष्ठ अधिका-यांनी विशेष लक्ष देऊन या योजना लवकरात लवकर पूर्ण करून शासनाला तात्काळ अहवाल पाठविण्याच्या सुचनाही केल्या. योजना पूर्ण करण्यास विलंबाला जबाबदार असलेल्या संबंधीत अधिकारी व कंत्राटदारांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबातच्या सुचना संबंधीत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन शासनाला त्वरीत अहवाल पाठवावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी अधिका-यांना दिले.