Breaking News

भंडारदरा पाणलोटात वरूणराजाचे पुनरागमन


अकोले / ता. प्रतिनिधी
आठ दिवसांपासून उघडीप घेतलेल्या वरुणराजाचे भंडारदरा पणलोटात, पुन्हा एकदा पुनरागमन झाले. मंगळवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील ओढे नाले भरून वाहू लागले.
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाने आठ दिवसांपासून उघडीप घेतली होती. त्यामुळे भंडारदरा धरणात नव्याने येणार्‍या पाण्याची आवक मंदावली होती. मुळा पाणलोट क्षेत्राचीदेखील हीच परिस्थिती होती. या दोन्ही पाणलोट क्षेत्रात ऊन सावल्यांचा खेळ सुरू होता. त्यामुळे बळीराजा चिंतेत पडला होता. आदिवासी शेतकर्‍यांची भात लावणीची तयारी सर्व पूर्ण झाली होती. मात्र पावसाने पाठ फिरवल्याने भात लावणी लांबणीवर पडली होती. त्यामुळे भंडारदरा मुळा पाणलोट क्षेत्रातील आदिवासी शेतकरी चिंतातुर झाले होते. अखेर या दोन्ही पाणलोट क्षेत्रात सोमवारी सायंकाळ पासून पावसाने हजेरी लावल्याने या भागातील शेतकरी खर्‍या अर्थाने सुखावला. या पावसाला पाहिजे तेवढा जोर नाही, मात्र भात लागवड करण्यास हा पाऊस पुरेसा आहे. या पाणलोट क्षेत्रांच्या परिसरात असणारे डोंगरदर्‍या, ओढे नाले तुडुंब भरुन वाहू लागले आहेत. हे पाणी आता धरणात पोहचणार असून त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होणार आहे. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर, पांजरे, रतनवाडी, वाकी या ठिकाणी आज रात्रीतून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा सकाळी 3745 दलघफू झाला असून, निळवंडे धरणाचा पाणीसाठा ही 648 दलघफू आहे. भंडारदरा धरणातून 1038 कुसेक्स वेगाने विसर्ग सुरू असून निळवंडे धरणातून 800 कुसेक्स वेगाने पाणी प्रवरा पात्रात झेपावत आहे.

भंडारदरा मुळा पाणलोट क्षेत्रात पाऊस सक्रिय झाला आहे. मात्र या धरणांच्या लाभक्षेत्रात पावसाने पुर्णपणे पाठ फिरवली आहे. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. या भागातील बळीराजा वरुणराजाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.