Breaking News

धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार - एकनाथ शिंदे

धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत चर्चा करणार असून धनगर समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त ठाण्यातील धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ या संघटनांच्या वतीने ठाण्यात गडकरी रंगायतन येथे आयोजित धनगर रत्न पुरस्कार सोहळ्यात केले.
 
धनगर समाज केले. कित्येक वर्षांपासून धनगर आरक्षण लागू करावे म्हणून प्रयत्न करत आहे. यासाठी समाजाने अनेक आंदोलने केली आहेत. परंतु धनगर आरक्षणाचा प्रश्‍न मात्र अद्याप सुटू शकलेला नाही यासाठी आपण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे याबाबत चर्चा करून आपला प्रश्‍न मांडण्याचा प्रयत्न करून समाजाला आरक्षण कसे मिळेल यासाठी प्रयत्न करेल असे आश्‍वासन एकनाथ शिंदे यांनी उपस्थित समाज बांधवाना दिले. ठाण्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात असून समाजाच्या मागणी लक्षात घेता समाजाला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी समाजभवन उपलब्ध करून देण्यासाठी मी समाजासोबत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. धनगर प्रतिष्ठान या संस्थेने समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना धनगर रत्न पुरस्कार देऊन समाजातील रत्नाची माहिती समाजाला करून देऊन सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याने संस्थेचे एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.