Breaking News

किसनवीर साखर कारखान्याच्या वतीने रविवारी कृषीदिन

सातारा, दि. 28, जून - किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने हरितक्रांतीचे प्रणेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती व कृषीदिन रविवारी (1 जुलै) सकाळी 10 वाजता कारखाना कार्यस्थळावर साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास फलोत्पादन संचालक पी. एन. पोकळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून यानिमित्ताने उपस्थित सभासद शेतकरी बांधवाना ते मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाने कृषीदिनाच्या निमित्ताने कार्यक्षेत्रातील सभासद शेतकर्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात होणार्या बदलाची माहिती व्हावी, यासाठी प्रतिवर्षी या कृषी दिनाचे औचित्य साधून कृषी, जल, पर्यावरण, फलोत्पादन अशा शेतीशी निगडीत विषयांसह विविध क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहे. यंदा कृषी दिनानिमित्ताने पी. एन. पोकळे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पी. एन. पोकळे यांनी राज्याच्या कृषी खात्यात कृषी सहसंचालक, विभागीय कृषी सहसंचालक, विभागीय मृद संधारण अधिकारी अशा विविध पदावर सुमारे पस्तीस वर्षांपासून काम केलेले असून त्यांच्या अनुभवाचे बोल या कार्यक्रमाच्यानिमित्ताने उपस्थित शेतकरी बांधवांना ऐकावयास मिळणार आहेत. यानिमित्ताने वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.