Breaking News

बिबट्याने कुत्र्याला केले ठार धनगरवाडीतील घटना


सोनई प्रतिनिधी - सोनई जवळील धनगरवाडी शिवारात बिबट्याचा अनेक दिवसांपासून मुक्त संचार आहे. आतापर्यंत बिबट्याने अनेक शेळ्या आणि कुत्रे ठार मारले आहेत. त्यामुळे वस्त्यांवरील लोक अत्यंत भयभीत असून रात्री विद्युत मोटारी सुरु करण्यासाठी जाण्यास घाबरत आहेत. वनविभागाने या भागात पिंजरा लावण्याची मागणी या परिसरातून केली जात आहे. 

धनगरवाडी शिवारात दि. १५ रोजी सुदैवाने बिबट्याच्या तावडीतून युवक बचावला. मात्र या तरुणाचे पाळीव कुत्रे बिबट्याने ऊसात नेऊन ठार मारले. धनगरवाडी भागात भगीरथ अण्णासाहेब गावडे यांची शेती आहे. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गावडे यांचा मुलगा सौरभ भगीरथ गावडे (वय १९) हा रात्री विद्युत मोटार सुरु करण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत त्याचे पाळीव कुत्रे गेले होते. मात्र याचवेळी बिबट्या ऊसातून बाहेर आला आणि त्याने डरकाळी फोडली. मुलगा सौरभ पुरता घाबरून मोठयाने ओरडला. मात्र बिबट्याने कुत्र्याला पंजाने मारून जखमी केले व मारून टाकले. सर्वत्र आरडाओरड व लोकांचे आवाज बॅटरींचा उजेड पाहून बिबट्या पळून गेला. घाबरलेल्या सौरभला गावडे कुटुंबियांनी घरी नेले. दवाखान्यात नेऊन उपचार केल्यानंतर त्याची घाबरट काही प्रमाणात कमी झाली. मात्र गावडे यांचे पाळीव कुत्रे बळी ठरले. दरम्यान, धनगरवाडी भागातील गावडे व इतर कुटुंबियांनी वनविभागाशी संपर्क साधला असता वन विभागाकडून पिंजरा अथवा कुठलीही ठोस कारवाई झाली नाही. सोनई आणि परिसरात बिबट्याचा संचार असून वनविभागाच्या दुर्लक्षामुळे वाड्यावस्त्यावरील लोक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहेत. आतापर्यंत सोनई भागातील अनेक शेळ्या आणि मेंढ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. प्रत्येकवेळी वनविभागाशी संपर्क साधला जात आहे. मात्र ठोस कार्यवाही या विभागाकडून केली जात नाही. वनविभागाबद्दल या भागात तीव्र नाराजीची भावना व्यक्त केली जात आहे. 

आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या व कुत्रे मारले गेले आहे. वनविभाग एखाद्या माणसावर हल्ला करण्याची वाट तर पाहत नाही ना, असा प्रश्न सामान्य शेतकरी विचारत आहेत. त्यातल्या त्यात नेवासा तालुक्यात वनविभाग अस्तित्वात आहे का, हाच मूळ प्रश्न आहे. अनेकांनी तक्रारी करूनसुद्धा वनविभागाचे कर्मचारी मात्र साधी चौकशी करण्यासाठी फिरकत नाहीत, याबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.