Breaking News

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करा


राहुरी प्रतिनिधी : जागतिक पर्यावरणदिन गेल्या ४५ वर्षांपासून साजरा होत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरापासून तर गावांपर्यंत पर्यावरण संवर्धनाची जागृती होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड व संवर्धन, प्लास्टिक बंदी आणि कमीत कमी वायू प्रदूषण होणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धन प्रत्येक घरातून होणे गरजेचे आहे. पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ निर्माण व्हावी आणि या चळवळीत प्रत्येक गावात आणि गावातील प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे. शुद्ध हवेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करा, असे आवाहन कुलगुरु डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठात जागतिक पर्यावरणदिन उत्साहात साजरा झाला. यावेळी अध्यक्षीय मागदर्शन करतांना कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर येथील उपवन संरक्षक अधिकारी आदर्श रेड्डी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर अधिष्ठाता (कृषि) डॉ. अशोक फरांदे, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, सहयोगी अधिष्ठाता (प.म.) डॉ. राजेंद्र पाटील, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, विद्यार्थी परिषद उपाध्यक्ष डॉ. राजीव नाईक, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शरद पाटील उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शन करतांना आदर्श रेड्डी म्हणाले, चांगल्या पर्यावरणामूळे सजीव सृष्टीला मोठा फायदा होतो. म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंमलात आणा.

याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनोद ठाकरे यांनी केले. कुलसचिव डॉ. दिलीप पवार यांनी आभार मानले.