Breaking News

स्वतःचे कृत्य झाकण्यासाठी चोराच्या उलट्या बोंबा : सोनवणे


संगमनेर प्रतिनिधी : राहाता तालुक्यातील हनुमंतगांव येथील बेकायदेशीर बेसुमार वाळू उपशाविषयी गेल्या आठ दिवसांपासून स्थानिक नेतृत्वाबद्दल तक्रारी आल्या. त्यानंतर हनुमंतगांवची चर्चा संगमनेरमध्ये नेऊन स्वतःचे कृत्य झाकविण्याचा केविलवाणा प्रयत्न करून चोराच्या उलट्या बोंबा मारण्याचे काम तेथील स्थानिक नेतृत्व करीत आहे, असे मत माजी सभापती अविनाश सोनवणे यांनी व्यक्त केले.

यासंदर्भात सोनवणे यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, कार्यकर्त्यांसाठी हनुमंतगावचा ठेका मिळावा, यासाठी कोणी मदत केली, हे सर्वांना माहित आहे. एका बाजूला ठेका मिळवयला मदत करायची तर दुसर्‍या बाजूला समाजसेवक अण्णा हजारे यांनी वाळू उपशाविरुध्द पुकारलेल्या आंदोलनास पाठिंबा द्यायचा, हे मोठे हास्यास्पद आहे. जनतेचे लक्ष विचलित करण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न जनतेच्या लक्षात आलेला आहे.

हनुमंतगांवच्या वाळू उपशाचा प्रश्‍न एवढा गाजत असताना संगमनेरबद्दल बोलून त्यांना काय साधायचे आहे, हे समजण्याइतकी जनता खुळी नाही. सध्या हनुमंतगावचा वाळू प्रश्‍न सोडवा, नागरिकांचे समाधान करा, मग संगमनेरचे पहा. संगमनेरमध्ये शेतकर्‍यांनी जर गायी गोठ्यात मुरुम टाकला तर त्याचासुध्दा दंड भरलेला आहे. याव्यतिरिक्त जर कोठे बेकायदेशीर वाळू उपसा सुरु असेल तर त्याविरुध्द जरुर कारवाई करावी. आम्ही कोणालाही पाठीशी घालत नाही. संगमनेरमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा करणारांविरुध्द कारवाई केली जाते. आजही तहसिल कार्यालयाचे आवारामध्ये जप्त केलेली वाहने आपल्याला पाहायला मिळतील. हनुमंतगावच्या बेकायदेशीर वाळू उपशाबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उभारलेल्या आंदोलनास आमचा पाठिंबा असून यापुढेही तो कायम राहणार असल्यायाचे सोनवणे यांनी पत्रकाच्या अखेरीस म्हटले आहे.