Breaking News

वृक्षारोपण मोहिमेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज


कुळधरण / प्रतिनिधी 
शासनाच्या वन, सामाजिक वनीकरण तसेच इतर विभागांच्या प्रयत्नांतुन 1 ते 15 जुलैै या कालावधीत वृक्षलागवड मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी सर्व विभागाकडून तयारी केली जात असुन, सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत.विविध नर्सरीमधून रोपे उपलब्ध करुन देण्यासाठी शासकीय विभाग प्रयत्नशील आहे. कर्जत तालुक्यातही या उपक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा विशेषत: नैसर्गिक साधन संपत्तीचा र्‍हास होत असल्याने, तापमानवाढ आणि हवामानातही बदल घडू लागले आहेत. यासर्व परिस्थितीमुळे निसर्गाचे संतूलन बिघडते आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करणे ही काळाची गरज मानून सर्वत्र वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनास प्राधान्य देण्यात येत आहे. यंदाच्या पावसाळ्यात अधिकाधिक झाडे लागावीत यासाठी, शासकीय यंत्रणेबरोबरच समाजातील सर्वच घटकांनी वृक्षारोपणाच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या कामात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता अनेक भागात वृक्षारोपण करण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. मात्र गेल्या काही दिवसात जिल्ह्यात राबविलेला जलसंधारणाचा प्रभावी कार्यक्रम, जलयुक्त शिवार अभियान आणि जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाद्वारे दुष्काळी भागात साठविण्यात येत असलेले पाणी यामुळे यंदा सर्वत्र वृक्षारोपणाला निश्‍चितपणे गती लाभण्याची परिस्थिती आहे.
या पावसाळ्यात वृक्षारोपणाचा भरीव कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यात हाती घेण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. 1 ते 15 जुलै या कालावधीत यंत्रणांना अधिकाधिक झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचे निर्देश दिले आहेत.विविध नर्सरीमधून तयार करण्यात आलेली लाखो रोपे वितरीत करण्यात येत आहेत. शैक्षणिक, सहकारी, सेवाभावी संस्थांबरोबरच शासकीय कार्यालये आणि नागरिकांच्या योगदानातुन ही लागवड केली जाणार आहे.
वृक्षारोपण मोहिमेत वन तसेच सामाजिक वनीकरण विभागाबरोबरच कृषी विभाग, प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महसूल, पोलीस, जिल्हा परिषद, शिक्षण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बालकल्याण विभाग, सहकार विभाग, सर्व साखर कारखाने, बँका, पतसंस्था, सेवा सोसायट्या, बाजार समित्या, वृक्षप्रेमी संस्था तसेच विविध औद्योगिक संस्था या सर्वांसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी या सर्वांच्या सहकार्यातुन ही मोहीम राबविली जाणार आहे.


कर्जत तालुक्यात होणार 2 लाखांची वृक्षलागवड 
कर्जत तालुक्यात रस्ता व कालवा दुतर्फा, गायरान जमिनीवर एक लाख पाच हजार रोपांची लागवड होणार आहे. ग्रामपंचायतींसाठी 99 हजार तीनशे रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट आहे. ग्रामपंचायतसाठी पारनेर येथून रोपे मागविण्यात येत आहेत. लिंब, आवळा, सिताफळ, करंज, शिसव, जांभूळ, कांचन, बांबु या रोपांची लागवड होणार आहे.
-एन.एम.सिंगल,
वनक्षेत्रपाल,
सामाजिक वनीकरण विभाग, कर्जत