विविध मागण्यांसाठी करपडी फाट्यावर रास्तारोको; बारामती-राशीन रस्ता सव्वा तास बंद
कुळधरण : पुलाची उंची वाढवावी, ओढ्यावर पाझर तलावाचे काम व्हावे, तसेच हक्काचे कुकडीचे पाणी टेल टु हेड पुर्ण दाबाने मिळावे, या प्रमुख मागण्यांसाठी कर्जत तालुक्यातील करपडी येथील ग्रामस्थांनी बारामती-राशीन मार्गावर करपडी फाटा येथे रास्तारोको आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. सुरेश शिंदे व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सायकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. सकाळी साडेनऊच्या दरम्यान हा रास्तारोको सुरू झाल्याने या मार्गावरून प्रवास करणार्या प्रवाशांचा खोळंबा झाला.रास्तारोकोत उपस्थित आंदोलनकर्त्यांनी पालकमंत्री राम शिंदे व विभागाच्या अधिकार्यांवर निष्क्रीयतेचे आरोप केले.
करपडी, बाभुळगाव व शिंपोरा या गावांना जोडणार्या ओढ्यावरील पुलाची उंची वाढवावी या मागणीने चांगलाच जोर धरला.प्रशासकीय अधिकारी हा विषय गांभिर्याने घेत नसल्याने, दरवर्षी पावसाळ्यात पुल पाण्याखाली जातो. या गावांचा संपर्क तुटतो. या पुलावरून शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी यांचा खोळंबा होतो. गेल्या दोन वर्षापासुन पालकमंत्री राम शिंदे व संबधित अधिकार्यांकडे लेखी तक्रारी केल्या, मात्र काहीच कारवाई होत नाही. या पुलाची शिंदे यांनी समक्ष पाहणी करून आश्वासन दिले असताना कार्यवाही होत नाही. कुकडीचे हक्काचे पाणी या भागाला टेल टु हेड पुर्ण दाबाने पाणी मिळावे व या ओढ्यावर पाझर तलाव व्हावा या मागणीवर आंदोलक आक्रमक झाले होते.
तहसिलदार किरण सावंत हे निष्क्रीय अधिकारी असुन त्यांचेकडे पुलाची वारंवार माहिती देऊनही, त्यांनी गांभिर्याने घेतले नाही.ते वाळुसाठी तत्पर करपडी गावात येतात. त्यावेळेस ग्रामस्थांनी दाखवलेल्या पुलाची व रस्त्याची अवस्थेकडे पाहत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भुमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.प्रशासनाच्यावतीने कुकडी कार्यकारी अभियंता चंद्रकांत पुंड यांनी सहा दिवसामध्ये कुकडीचे 600 क्युसेक पाणी मिळेल अशी ग्वाही दिली. पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी पुलाचा सर्वे झाला असुन त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा परीषदेकडे पाठवला असल्याचे सांगितले.
रास्ता रोकोत युवक नेते श्याम कानगुडे, राशीनचे माजी सरपंच शिवदास शेटे, रविंद्र काळे, मोहन काळे, विठ्ठल सायकर, युवराज हाके, सुरेश सोलनकर, इस्राईल पठाण, करपडीचे माजी सरपंच वैभव काळे, श्याम काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. हे आंदोलन सव्वा तास चालले. आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
