बदलीत दिशाभूल करणार्या शिक्षकांवर कारवाईची मागणी
सोलापूर - चालू शैक्षणिक वर्षात जिल्ह्यांतर्गत बदल्यामध्ये चुकीची माहिती भरून बदली प्रक्रियेचा लाभ घेतलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी येथील डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेकडून गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनामध्ये म्हटले आहे, बदली प्रक्रिया राबवली जात असताना काही शिक्षकांनी संवर्ग एक व संवर्ग दोनमधील तरतुदींचा गैरफायदा घेऊन सोयीच्या ठिकाणी बदल्या करून घेतलेल्या आहेत. क ाही शिक्षकांनी खोटे पुरावे जोडलेले आहेत. सक्षम अधिकार्यांचे दाखले जोडले नाहीत. संबंधित संवर्गामध्ये नसताना त्या संवर्गाचा लाभ घेतलेला आहे. एसटी महामंडळाचा अंतराचा खोटा दाखला जोडला आहे, आदी प्रकारचे आरोपही निवेदनामध्ये करण्यात आले असून, चौकशी करण्याची मागणी केली गेली आहे.
