बिबट्याच्या हल्ल्यात विद्यार्थी जखमी
।संगमनेर/प्रतिनिधी।
शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात एक शाळकरी जखमी झाला. निमगावपागा, सांगवी शिवारात मंगळवारी {दि. २६ } रात्री पावणे आठ वाजता ही घटना घडली.
सांगवी येथील तेजस साहेबराव कातोरे (वय-१७) आणि शेखर कातोरे हे दोघे दुचाकीने वाहनाचे काम करण्यासाठी निमगावपागा या ठिकाणी गेले. काम आटोपल्यावर पुन्हा घरी जात असताना निमगाव व सांगवीच्या शिवारात रस्ता पार करत असताना या दोघांची दुचाकी बिबट्याच्या जवळून गेली असता अचानक बिबट्याने दुचाकीवर झेप घेतली. मागे बसलेल्या तेजस कातोरे या विद्यार्थ्याला बिबट्याने जोराचा पंजा मारत त्याच्या पायाला चावा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मोटरसायकल जोरात असल्याने तेजसच्या पायाला बिबट्याचे दात ओरखडल्याने पायाला चांगल्याच जखमा झाल्या.
सदर विद्यार्थ्याला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी निमगाव पागा येथे डॉ. कानवडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर रक्तस्राव जास्त होत असल्यामुळे त्याला तात्काळ संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
घटनेची खबर मिळतात वनविभागाचे शेखर पाटोळे, पवार हे तेजस उपचार घेत असलेल्या खाजगी रुग्णालयात गेले. यावेळी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सांगवी व निमगाव परिसरात पुन्हा बिबट्याच्या दहशतीचे वातावरण झाले आहे. वनविभागने तातडीने या भागात पिंजरा लावण्याची मागणी या भागातील ग्रामस्थांनी केली आहे.