Breaking News

नगराध्यसक्ष कदम यांनी अडविल्या वाळू वाहतुकीच्या मालमोटारी


राहुरी तालुका प्रतिनिधी : तालुक्यातील देवळालीप्रवरा नगरपालिका हद्दीतील रस्‍त्‍यावरुन वाळू वाहतूक केली जात असल्‍याने शहरातील रस्‍ते खराब होत आहेत. जातप व करजगाव नदीपात्रातील वाळू वाहतुकीच्‍या मालमोटारी नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम यांच्‍यासह नागरीकांनी आज {दि. ६} सकाळी लाख रस्‍ता येथे अडविल्या. देवळालीप्रवरा हद्दीतून ही वाहतूक बंद करण्‍यासाठी महसूल व पोलिस प्रशासनास निवेदन देण्‍यात आले आहे. दरम्यान, वाळू वाहतूक सुरु राहिल्‍यास तीव्र स्‍वरुपाचे आंदोलन करण्‍यात येईल, असा इशारा नगराध्‍यक्ष कदम यांनी दिला.

राहुरी तालुक्‍यातील जातप व करजगाव प्रवरा नदीपात्रातील वाळूचा लिलाव झाला आहे. त्यामुळे वाळू वाहतुकीची वाहने दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. देवळालीप्रवरा नगरपालिकेच्‍या हद्दीतून ही सर्व वाहने वाळू वाहतूक करीत आहेत. प्रमाणापेक्षा जास्‍त वाळू वाहनात भरली जात असल्‍याने व नगरपालिकेचे रस्‍ते खराब होत आहेत. नागरिकांच्‍या तक्रारीवरुन बुधवारी {दि. ६}सकाळी लाख रस्‍त्‍याकडून देवळाली प्रवरात येणारे वाळू वाहतुकीचे चार डंपर अडविण्‍यात आले. नगराध्‍यक्ष कदम यांच्‍यासह नागरीकांनी वाळू वाहतुकीची वाहने अडविल्‍यानंतर महसुल व पोलिस खात्‍याची धावपळ उडाली. महसूल खात्‍याचे कामगार तलाठी जालिंदर पाखरे यांनी भेट देऊन आंदोलकांचे निवेदन स्विकारले. वाळू वाहतुकीस पर्यायी रस्‍ता वापरण्‍यास सांगण्‍यात येईल, असे आश्‍वासन पाखरे यांनी यावेळी दिले.

यावेळी नगराध्‍यक्ष सत्‍यजित कदम, उपनगराध्‍यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक सचिन ढुस, भारत शेटे, आदिनाथ कराळे, अमोल कदम, शिवाजी मुसमाडे, सुधीर टिक्‍कल, संदीप कदम, राजेंद्र कदम, सुर्यकांत कदम, अतुल कदम, मंजाबापु वाळुंज, भाऊसाहेब वाळुंज, सचिन सांबारे, अमोल वाळुंज, रितेश कदम, रमेश वाळुंज, सागर गडाख, विलास वाळुंज, बाळासाहेब कदम, युनूस शेख, भाऊसाहेब पंडीत, भाऊसाहेब कदम, मंजाबापू कदम, हुसेन शेख, सचिन कदम, अक्षय कदम, संदीप गडाख, शशिकांत मुसमाडे आदिसह परिसरातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.