Breaking News

तुर नोंदणीपासुन वंचित ठेवल्याचा खुलासा द्या ! सहायक निबंधकाचा आदेश


शेवगाव प्रतिनिधी 
येथील बाजार समिती अंतर्गत सुरु असलेल्या शासकीय तुर खरेदी केंद्राच्या कार्यालयामध्ये
कागदपत्रे देवूनही ऑनलाईन नोंदणी न करता शासकीय तुर विक्रीपासुन वंचित ठेवले असल्याची तक्रार तालुक्यातील बोधेगाव व अधोडी येथील शेतकर्‍यांनी केल्यानंतर , या तक्रारीची दखल सहायक निबंधक अधिकारी अनिल भांगरे यांनी घेत, या संदर्भात बाजार समितीच्या सचिवाला लेखी खुलासा देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की शेतकर्‍यांला शेतीतून मिळणार्‍या मालाला हमी भाव मिळावा व व्यापार्‍याकडून होणारी लूट थांबावी या उद्देशाने शासनाने तूर हमी केंद्र सुरु केले. शेवगाव बाजार समितीच्या आवारात असलेल्या जगदंबा महिला सहकार संस्थेला हे अधिकार देण्यात आले आहे. या तूर खरेदी केंद्रात तालुक्यातील बोधेगाव येथील दत्तात्रय घोरतळे, सुभाष घोरतळे, परमेश्‍वर तांबे, भागवत घोरतळे, साईनाथ पोटभरे, नितीन घोरतळे आदी शेतकर्‍यांनी संस्थेच्या या कार्यालयात तुर विक्रीकरीता ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी आपले सातबारा व आठ अ उतारा,आधार ओळखपत्र आणि बँक पासबुक प्रत आदी कागदपत्रे दिली होती . मात्र ही कागदपत्रे देऊनही या शेतकर्‍यांना कागदपत्रे दिल्याची पोहोच मात्र देण्यात आली नाही . तसेच या शेतकर्‍यांच्या तुरीची नोंदणीही न केल्याने हे सर्व शेतकरी तुरविक्रीपासून वंचित राहिल्याने या शेतकर्‍यांनी पणनमंत्री व सहायक निंबंधक आधिकारी कार्यालयात तक्रार केली होती. या शेतकर्‍यांच्या तक्रारीची दखल घेऊन भांगरे यांनी बाजार समितीच्या सचिवाला नोटीस देऊन तातडीने खुलासा मागितला आहे. यावर आता समिती नेमका काय खुलासा करणार याकडे तूर उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.