Breaking News

एसटी कर्मचार्‍यांची निलंबने पाठीमागे घ्या ! शेवगाव येथे सर्वपक्षीय रास्ता रोकोे


शेवगाव प्रतिनिधी 
एसटी कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी व वेतनवाढीसाठी 8 जून रोजी राज्यव्यापी संप झाला. या काळामध्ये राज्यातील विविध भागांमध्ये व शेवगावमध्ये पाच कर्मचार्‍यांचे निलंबन होऊन भा.द.वि कलम 141 प्रमाणे संबंधित कर्मचार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. शेवगाव आगारातील पाच कर्मचार्‍यांवर एस.टी. महामंडळाचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवून त्यांचा कार्यालयीन अहवाल सादर करून त्यांना निलंबित करण्यात आले होते.
परंतु आठ जूनचा राज्यव्यापी संप शासनाने मागे घेताना निलंबन केलेल्या कर्मचार्‍यांवरील निलंबन मागे घेऊ गुन्हे मागे घेऊ असे त्यावेळी कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाला राज्य शासनाकडून सांगितले गेले होते. परंतु संपानंतर काही दिवसांनी शेवगाव आगारातील काही कर्मचार्‍यांना व्यक्ती दोषातून त्यांचे निलंबन करण्यात आले. वास्तविक या कर्मचार्‍यांनी संपामध्ये राज्यातील इतर कर्मचार्‍यांप्रमाणे सहभाग घेतला होता. परंतु त्यांनी एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान केले म्हणून हेतुपुरस्कर गुन्ह्यात गोवण्यात आले. त्यामुळे शेवगाव आगारातील या कर्मचार्‍यांवर अन्याय झाल्याची भावना लक्षात घेऊन शेवगाव तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व सामाजिक संघटनांनी शेवगावचे आगार प्रमुख देवराज यांना एका निवेदनाद्वारे ही कारवाई मागे घेण्यात यावी असे कळविले होते ही कारवाई मागे घेतली गेली नाहीतर वीस तारखेला सर्व पक्षांच्या वतीने शेवगाव मध्ये रास्ता रोको करण्यात येईल असे निवेदनाद्वारे कळविले होते. परंतु गेल्या आठ दिवसात कर्मचार्‍यावरील निलंबन मागे न घेतल्यामुळे शेवगाव मध्ये काल सर्वपक्षीयांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आले.
या रास्ता रोको मध्ये भारतीय टायगर फोर्स चे अध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सचिव संजय नांगरे, अ‍ॅड. सुभाष लांडे, प्राचार्य शिवाजीराव देवढे, जनशक्ती मंचचे अध्यक्ष शिवाजीराव काकडे, मा. सभापती अरुण लांडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय कोळगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष दत्ता फुंदे , राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, नगरसेवक शब्बीर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, नगरसेवक सागर फडके, मनसेचे तालुका अध्यक्ष गणेश रांधवणे, मनसेचे शहराध्यक्ष संतोष मगर, शेतकरी बचाव जन आंदोलनाचे शहाराम आगळे, शिवसेनेचे अविनाश मगरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ कुसळकर, सामाजिक कार्यकर्ते विजू भाऊ बोर्डे, राजू मगर, भगवान गायकवाड, किसान सभेचे बापूसाहेब राशिनकर इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रस्ता रोको आंदोलनात सहभागी झाले होते. हे आंदोलन शेवगावच्या क्रांतीचौकात करण्यात आले .यावेळी गाड्यांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आलेले निवेदन शासन प्रतिनिधी म्हणून विभागीय अधिकारी बाळासाहेब एकशिंगे व शेवगाव बस व्यवस्थापक देवराज या अधिकार्‍यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी या पाच कर्मचार्‍यांचे निलंबन तत्काळ मागे घेत आहोत असे त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले. यावेळी शेवगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक गोविंद ओमासे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.