Breaking News

सॅचिनाटोचा रोमहर्षक विजय:भारताचे आव्हान संपुष्टात


इटलीच्या मार्को सॅचिनाटोने माजी विजेत्या नोव्हाक जोकोव्हिचला पराभूत करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत रोमहर्षक विजय मिळवला. याचबरोबर जोकोव्हिचचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. तर याच दरम्यान भारताचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा फ्रान्सचा सहकारी ई. रॉजर व्हॅसेलिन या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. क्रोएशियाच्या निकोला मेकटिक आणि ऑस्ट्रियाचा अलेक्झांडर पेया या जोडीने ७-६(७/४), ६-२ असा १ तास ३२ मिनिटांत विजय मिळवला.

इटलीच्या मार्को सॅचिनाटोविरुद्ध माजी विजेत्या नोव्हाकचे (२०१६चा विजेता) पारडे जड होते, परंतु २५ वर्षीय सॅचिनाटोने पहिले दोन सेट घेत सर्वाना आश्चर्यचकित केले. तरीही चाहत्यांनी नोव्हाककडून पुनरागमनाच्या आशा कायम राखल्या होत्या. त्यांच्या या अपेक्षांना साजेसा खेळ करताना नोव्हाकने जोरदार मुसंडी मारली खरी, परंतु सॅचिनाटोच्या मजबूत निर्धारासमोर कुठेतरी तो कमी पडला. सॅचिनाटोने टायब्रेकपर्यंत रंगलेल्या चौथ्या सेटमध्ये नोव्हाकच्या तंदुरुस्तीचा कस पाहिला आणि तोडीसतोड खेळ करताना बाजी मारली. नोव्हाकने या टायब्रेकरमध्ये तीन वेळा सॅचिनाटोचे मॅच पॉईंट हिसकावून घेतले. तरीही त्याला पराभव टाळता आला नाही.

प्रेक्षकांचा पाठींबा नोव्हाकच्या बाजूने असूनही सॅचिनाटोने आपले मनोबल खचू न देता जवळपास ३ तास २६ मिनिटे चाललेल्या लढतीत ६-३, ७-६(७-४), १-६, ७-६ (१३-११) अशी बाजी मारली. जागतिक क्रमवारीत खालच्या स्थानावर असूनही १९९९नंतर फ्रेंच खुल्या स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा सॅचिनाटो पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी अँड्रेई मेडव्हेडेव्ह (१०० क्रमवारी) यांनी १९९९ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.अन्य लढतीत अमेरिकेच्या मेडिसन कीज व स्लोएनी स्टीफन्स यांनी शानदार विजय मिळवत फ्रेंच खुल्या स्पर्धेत प्रथमच एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. पुरुष गटात सातव्या मानांकित डॉमिनिक थिमनेही एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली.