Breaking News

स्वच्छ सर्वेक्षण २०१८ वर महाराष्ट्राची छाप



मुंबई : स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत राज्यातील २८शहरांनी पहिल्या १०० क्रमांकामध्ये स्थान मिळविले असून एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील ५८शहरांनी स्थान मिळविले आहे. स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये गेल्यावर्षीपेक्षा यंदा राज्यातील सर्वात जास्त शहरांनी क्रमांक पटकविला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ची क्रमवारी आज जाहीर करण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्रातील शहरांनी आपली छाप पाडल्याचे दिसून येत आहे.


दरम्यान, स्वच्छ भारत सर्वेक्षणमध्ये देशात दुसरा क्रमांक मिळविल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील इंदौर येथील कार्यक्रमात राज्याला पुरस्काराने गौरविण्यात आले.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली होती. या अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ४जानेवारी २०१८ते १० मार्च २०१८ या कालावधीत देशातील ४२०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये राज्यातील ४३ अमृत शहरांनी तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या २१७ शहरांनी सहभाग घेतला होता.