Breaking News

जिल्ह्यातील 80 टक्के हरभरा शेतकर्‍यांच्या घरात पडून

अकोला, दि. 03, जून - ‘नाफेड’मार्फत तूर व हरभरा खरेदी बंद करण्यात आली असून ऑनलाइन नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील 52 हजार शेतकर्‍यांच्या घरात तूर, हरभरा खरेदीविना अद्याप पडून असल्याने, शेतकरी पेचात सापडला आहे. खरीप पेरणी तोंडावर आली असताना, तूर व हरभरा खरेदीचा प्रश्‍न कायम असल्याने, पेरणीचा खर्च कसा भागविणार, असा प्रश्‍न अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. 

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत ‘नाफेड’मार्फत जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, पातूर, पारस, वाडेगाव व पिंजर या सात केंद्रांवर तूर व हरभरा खरेदी करण्यात आली. तूर खरेदीसाठी जिल्ह्यातील 45 हजार 955 शेतक-यांनी ऑनलाइन नोंदणी केली. तर हरभरा खरेदीसाठी 23 हजार शेतकर्‍यांनी नोंदणी केली. खरेदीची मुदत संपल्याने, गत 15 मे पासून नाफेडमार्फत तूर खरेदी बंद करण्यात आली तसेच 29 मे पासून हरभरा खरेदी बंद करण्यात आली. खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी जिल्ह्यातील गोदामात जागा उपलब्ध नसल्याने, खरेदीच्या सुरुवातीपासूनच तूर व हरभरा खरेदी संथगतीने करण्यात आली. त्यामुळे खरेदी बंद होईपर्यंत ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांपैकी केवळ 13 हजार 809 शेतक र्‍यांची तूर खरेदी करण्यात आली असून, 3 हजार शेतकर्‍यांचा हरभरा खरेदी करण्यात आला. नोंदणी केलेल्या 32 हजार 146 शेतकर्‍यांची तूर आणि 20 हजार शेतकर्‍यांचा हरभरा खरेदी क रण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. नोंदणी केलेल्या जिल्ह्यातील 52 हजार 146 शेतकर्‍यांची तूर व हरभरा खरेदीविना अद्याप घरात पडून आहे. खरीप पेरण्या तोंडावर आल्या असताना तूर व हरभ-याची खरेदी अद्याप बाकी असल्याच्या स्थितीत खरीप पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते व जमीन मशागतीचा खर्च कसा भागविणार, असा पेच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे.