
राहुरी ता. प्रतिनिधी - नीट परिक्षेसाठी जिल्ह्यात अहमदनगर येथेच अवघे दोनच केंद्र आहेत. त्यापैकी नगर-औरंगाबाद रस्त्यावरील यशश्री अँकेडमी येथील केंद्रात परीक्षा मंडळांच्या चुकीच्या आणि गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना पेपर वेळेत देण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे यामुळे खूप नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. यामध्ये संबंधित विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास परीक्षा मंडळ जबाबदार राहील, असा इशारा परीक्षार्थी विद्यार्थिनीचे पालक मनिषा कुलकर्णी यांनी दिला.त्या म्हणाल्या, १२ वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ‘नीट’ परीक्षा देणे बंधनकारक असते. या परिक्षेसाठी दोन वर्षांपूर्वी अहमदनगर येथे दोन परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले. त्यामध्ये नगर-औरंगाबाद राज्य महामालगतच्या जेऊरजवळील धनगरवाडी येथील यशश्री अँकडमी आणि दूसरे सोलापूर रस्त्यावरील केंद्रीय विद्यालय या दोन केंद्रांचा समावेश आहे. नीट परिक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची दोन वर्षांपासून तयारी असते. ही परीक्षा अतिशय कड़क वातावरणात होते. त्यासाठी परीक्षा मंडळाने अनेक नियम अटी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना घालून दिल्या आहेत. यशश्री अँकडमी याठिकाणी परिक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना अनेक समस्या भेडसावल्या. सदर संस्था राज्य महामार्गापासून एक किलोमीटर आत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणताही दिशादर्शक फलक नव्हता. मुख्य प्रवेशद्वारावर संस्थेचा अथवा परीक्षा मंडळाचा कोणताही कर्मचारी-अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे परीक्षार्थींना कोणतीही माहिती वेळेत मिळू शकली नाही. परीक्षा केंद्राच्या प्रवेशद्वारावर पालक आणि विद्यार्थी यांची प्रचंड गर्दी झाली होती. बैठक व्यवस्था, परिक्षेचे वेळापत्रक अशा ठिकाणी लावण्यात आले होते, की ते पाहण्यात विद्यार्थ्यांचा खूप वेळ गेला. परीक्षा केंद्रात प्रवेश देण्याबाबत जे नियम- अटी होत्या, त्यात आणि परीक्षा मंडळाच्यावतीने देण्यात आलेल्या सूचना यात खूप मोठी तफावत होती.
परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना नियमाप्रमाणे साडेनऊ वाजता प्रवेश देण्यात येऊन सर्व बाबी पूर्ण करणे गरजेचे होते. मात्र त्यात जास्त वेळ वाया घालवून अर्धा तास उशिरा पेपर देण्यात आले. दहा वाजता सुरु होणारा पेपर प्रत्यक्षात साडेदहा वाजता सुरु झाला. पेपरची वेळ एक वाजेपर्यंत होती. मात्र पेपर वेळेआधी घेण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना पूर्णवेळ पेपर लिहिण्यास मिळाला नाही. परीक्षा मंडळाच्या गलथान कारभाराचा फटका विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याशी शक्यता निर्माण झाली आहे.