Breaking News

मंत्रालय इमारत चौकशीच्या फेर्‍यात हांडे-वाळकेंची घोटाळेखोरी चव्हाट्यावर रणजीत हांडेंची याचना गृहराज्यमंत्र्यांनी धुडकावली

मुंबई/विशेष प्रतिनिधी । सन 2015-16 या आर्थिक वर्षात शहर इलाखा साबां विभागातील डेब्रीज घोटाळ्याची चौकशी वेग घेत असताना संशयीत कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी दादा! मला वाचवाची साद घालून चौकशी प्रक्रियेत अडचणी निर्माण करण्याचा शकूनी प्रयत्न सुरू केला आहे. शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दप्तरातील जुन्या नोंदी बदलून मनाप्रमाणे नव्या नोंदी करण्याची खोड जडल्याने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरील सुरक्षा यंत्रणेवर दबाव टाकून घोटाळा वर्षातील आवज जावक नोंदी बदलण्याचा खटाटोप केला, तथापी इथेही तोंडघशी पडल्याने घोटाळेखोरांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंत्रालयाच्या आवारातून नऊशे ट्रक्स डेब्रीज बाहेर नेणे आणि बाराशे ट्रक्स काळा दगड मंत्रालय आवारात आणणे असा विक्रम शहर इलाखा साबां विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांच्या कार्यकाळात झाल्याने साबांत आश्‍चर्य व्यक्त होत असतांना आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या पाठपुराव्याने हे प्रकरण चौकशीच्या प्र क्रियेत आले. सन 2015-16 या आर्थिक वर्षात शहर इलाखा साबां विभागात झालेला गोंधळ महायुतीच्या पारदर्शक कारभाराचा गळा घोटण्यास कारणीभूत ठरल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिमा आणि प्रतिष्ठा भ्रष्टाचाराच्या वळचणीला बांधण्याची तयारी तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी केली होती. तथापी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी प्रसंगावधान राखून मुख्यमंत्री आणि साबां मंत्र्यांकडे केलेल्या तक्रारींमुळे हा पंधरा हजार क ोटींचा घोटाळा चर्चेत आला आणि मंत्रालय इमारत चौकशीच्या फेर्‍यात आली आहे. आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्री आणि साबां मंत्र्यांकडे एकूण सात तक्रारी केल्या असून या सातही तक्रारींची चौकशी युध्दपातळीवर पुर्ण करण्याच्या हेतूने मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता पांढरे यांच्याकडे उंदीर घोटाळा, मुंबई साबां अधिक्षक अ भियंता यांच्या मंत्रालयातील डेब्रीज तर उरलेल्या पाचही तक्रारींची चौकशी मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांच्याकडे देण्यात आली आहे. 
अशा विविध पातळींवर चौकशीचा वेग वाढल्याने एकाच वेळी सर्व घोटाळे चव्हाट्यावर येऊन दोषारोप सिध्द होण्याची शक्यता वाढल्याने रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके अस्वस्थ आहेत. चौकशीच्या या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी रणजीत हांडे आणि प्रज्ञा वाळके यांनी साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा पिच्छा पुरविण्यास सुरूवात केली आहे. रणजीत हांडे यांनी दोन दिवस साबां मंत्र्यांच्या निवास स्थानावर ठिय्या मारल्यानंतर गृहराज्यमंत्री (शहरे) रणजीत पाटील यांच्याशी लगट करून मंत्रालय प्रवेशद्वारावर बंदोबस्त करणार्‍या सुरक्षा यंत्रणेवर दबाव आणून सन 2015-16 या आर्थिक वर्षात मंत्रालय प्रवेशीत झालेल्या काळा दगड, बाहेर गेलेल्या डेब्रीज ट्रक्सच्या नोंदी बदलण्याचा खटाटोप केला. तथापी ना. रणजीत पाटील यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहीती घेऊन सुरक्षा अधिकार्‍यांकडून शहनिशा केली आणि रणजीत हांडे यांना पुन्हा तोंड लपवून काढता पाय घ्यावा लागला. एकूणच या घोटाळ्याची सत्यता बाहेर येऊ लागल्याने रणजीत हांडे यांना वाचविण्यात सरकारमधील ब्रम्हदेवाला शक्य नसल्याची चर्चा साबांत आहे.
अशा आहेत आ. चरणभाऊ वाघमारेंनी केलेल्या तक्रारी आणि चौकशी अधिकारी
क्र. तक्रारीचे नाव चौकशी अधिकारी घोटाळा लाखात

1) उंदीर घोटाळा पांढरे, (मुंबई साबां दक्षता 
पथक अधिक्षक अभियंता) रू 4,79100/-
2) मंत्रालय डेब्रीज घोटाळा अरविंद सूर्यवंशी, (मुंबई 
साबां अधिक्षक अभियंता) 34 लाख
3) पेव्हर ब्लॉक धनंजय चामलवार 
(मुंबई साबां दक्षता पथक 
अधिक्षक अभियंता) 25 लाख
4) प्रधान सचिवांचे दालन क्र. 618 धनंजय चामलवार 72 लाख 
5) मंत्रालय काँक्रीटीकरण घोटाळा धनंजय चामलवार 21 लाख
6) साईन बोर्ड घोटाळा धनंजय चामलवार 26,50,000
7) एकाच दिवशी 870 मजूर घोटाळा धनंजय चामलवार 24 लाख


या प्रत्येक घोटाळ्यावर उद्यापासून तपशीलवार वृत्तांत...