Breaking News

मासेमारीसाठी एलईडी लाईटच्या वापरास प्रतिबंध करण्याबाबत अधिसूचना जारी

मुंबई, दि. 8: राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (12 सागरी मैल) यांत्रिक तसेच यंत्रचालित (बोटी) मासेमारी नौकांना कृत्रिम एलईडी लाईट, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतीही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी कृत्रिम उपकरणे बसवणे अथवा त्याचा मासेमारीसाठी वापर करण्यास प्रतिबंध करण्याबाबतची अधिसूचना राज्य शासनाने काढली आहे.

यांत्रिक तसेच यंत्रचालित (बोटी) मासेमारी नौकांवर बेकायदेशीररित्या एलईडी लाईटची यंत्रणा लावून मासेमारी क्षेत्रात प्रकाश झोत टाकून मासेमारी करण्यात येत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी मासे जमा होऊन मासेमारी होत असल्याने सागरी क्षेत्रातील माशांच्या साठ्यावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच पारंपरिक होडी वापरुन मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांचे हितसंबंध जपण्यासही मर्यादा येत आहेत. या कारणाने शासनाने ही अधिसूचना काढली आहे.

केंद्र शासनाने दिनांक 10 नोव्हेंबर 2017 च्या आदेशानुसार सागरी जलधी क्षेत्राबाहेरील भारतीय विशाल आर्थिक क्षेत्रात ट्रॉलिंग, पर्ससीन आणि अथवा जाळी यांचा वापर करणाऱ्या यांत्रिक तसेच यंत्रचलित मासेमारी नौकांवर जनरेटरवर अथवा जनरेटरशिवाय चालणारी विनाशकारी मासेमारी पद्धतीस प्रतिबंध केला आहे. प्रतिबंध करण्यात आलेल्या विनाशकारी मासेमारी पद्धतीमध्ये बुल व पेअर-ट्रॉलिंगचाही समावेश आहे. तसेच पाण्याखाली, बुडीत अथवा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते कृत्रिम दिवे, एलईडी लाईट, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा कोणतेही इतर प्रकाश उत्सर्जित करणारी कृत्रिम साधने, उपकरणे बसवणे अथवा त्याचा उपयोग करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या मासेमारीला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही केंद्र शासनाने राज्य शासनाला दिल्या आहेत.

शास्त्रीय तत्त्वावर मासेमारीचे नियमन करण्यासाठी आणि मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या निरनिराळ्या वर्गातील व्यक्तींच्या आणि विशेषत: पारंपरिक होडी वापरून मासेमारीचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यास राज्य शासन महत्त्व देत आहे. मासेमारीवर नियंत्रण ठेवण्याच्या उत्तम व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून माशांचे जतन करणे आणि समुद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्याची गरज लक्षात घेण्यात येत आहे.

त्यानुसार महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1981 मधील अधिकारांचा वापर करून आणि या अधिनियमानुसार गठित करण्यात आलेल्या सल्लागार समित्यांशी विचारविनिमय करून शासनाने ही अधिसूचना काढली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (12 सागरी मैल) ट्रॉलिंग किंवा पर्ससीन किंवा गिलनेट किंवा डोलनेट यांचा वापर करणाऱ्या यांत्रिक तसेच यंत्रचालित (बोटी) मासेमारी नौकांना जनरेटरवर अथवा जनरेटर शिवाय चालणारे बुडीत, पाण्याखाली अथवा पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते कृत्रिम एलईडी लाईट, दिवे, माशांना आकर्षित करणारे दिवे किंवा प्रकाश उत्सर्जित करणारी कोणत्याही इतर कृत्रिम उपकरणांचा वापर करणे किंवा ती बसवणे अथवा मासेमारीसाठी उपयोग करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

याच बरोबर राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात(12 सागरी मैल) बुल आणि पेअर ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करण्यासही प्रतिबंध करण्या आला आहे. राज्याच्या सागरी जलधिक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व मासेमारी नौका तसेच या नौकांना सहाय्य करणाऱ्या व आधार किंवा पुरवठा करणाऱ्या सर्व संलग्न नौकांना हे आदेश बंधनकारक असतील असेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.