Breaking News

हिवरेबाजारमधील फोटो वॉक व उत्कृष्ट फोटो स्पर्धेला मोठा प्रतिसाद चिंगारी ग्रुपच्या उपक्रमात हौशी छायाचित्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग


नगर : रणरणत्या उन्हात डोळ्याला थंडावा देणारी हिरवळ, पक्ष्यांचा किलबिलाट, हरिण, मोर यांचे स्वच्छंदी बागडणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाधानाने व आनंदाने ओतप्रोत असलेले ग्रामीण चेहरे अशा समृध्द गावाच्या विविध छटा नगरमधील हौशी फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेर्‍यात कैद केल्या. नगरमधील चिंगारी ग्रुपच्यावतीने आदर्शगाव हिवरेबाजार येथे नुकतीच फोटो वॉक आणि उत्कृष्ट फोटो स्पर्धा घेण्यात आली. सकाळी ७ ते १० यावेळेत नगर शहरासह जिल्ह्यातील हौशी, नवोदित छायाचित्रकारांनी हिवरेबाजार शिवारात आनंददायी फोटोग्राफीचा मनसोक्त आनंद लुटला.

आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी सर्व छायाचित्रकारांचे गावात स्वागत करून त्यांना हिवरेबाजारच्या आदर्श वाटचालीची माहिती दिली. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे करून गावाने रुप तर पालटलेच आहे. आर्थिक सुबत्ता साधतानाच ग्रामस्थांनी आता आनंदाचा जीडीपी वाढविण्याचा संकल्प केल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पाणीटंचाई असताना शिस्तबध्दता व नियोजनामुळे हिवरेबाजारमध्ये घरोघरी नळाव्दारे नियमित पाणी येते. त्यामुळे प्रफुल्लित असलेले चेहरे, गावातील स्वच्छता, गावाजवळील डोंगरांवर वन्यजीव, पक्षी यांचा मुक्तसंचार हि खरी समृध्दी असल्याचे सांगत पवार यांनी अशा वातावरणात छायाचित्रण कलेलाही बहर येईल, असा विश्वास व्यक्त केला.

छायाचित्रकार रितेश नागे,गायत्री कदम,दिशा भट्ट,पराग शहा, नितीन केदारी,रंगनाथ शिंदे, विठठल जोंधळे( संगमनेर), संदीप कांबळे, इंद्रजीत पाटील,यश मुथा, शिवानंद भांगरे आदींनी या आनंददायी व प्रफुल्लित वातावरणात हिवरेबाजारमधील निसर्ग सौंदर्य, रस्ते, शेती, स्वच्छता, ट्रेनिंग सेंटर, डोंगरावरील पशुपक्षी, शाळेची इमारत, ग्रामसंसदच्या विविध छटा कॅमेर्‍यात टिपल्या. वृत्त छायाचित्रकार जितेंद्र अग्रवाल यांनी नवोदित छायाचित्रकारांना मार्गदर्शन केले.

नितीन केदारी यांनी काढलेल्या निसर्ग छायाचित्राची फ्रेम पोपट पवार यांना सर्वांच्या वतीने भेट देण्यात आली. या स्पर्धेसाठी आकाश कांबळे, सचिन कलमदाणे, शिवानंद भांगरे, संतोष कांडेकर, दीपक पवार, अमोल पादीर यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेतील उत्कृष्ट छायाचित्रांना पारितोषिक देण्यात येणार असून पावसाळ्यात जुलै शेवटच्या आठवडयात पावसाळी फोटो वॉक हिवरेबाजारला होणार आहे.तसेच या उपक्रमाची छायाचित्रे नगर ब्रेंडीग च्या फेसबुक पेजवर पाह्ता येतील आशी माहिती जितेंद्र अग्रवाल यांनी दिली