Breaking News

शहरासह तालुक्यात खुलेआम अवैध धंदे सुरूच


जामखेड : येथील गेल्या अनेक महिन्यापांसून रिक्त जागा असलेल्या जामखेड पोलिस स्टेशनमधील पोलिस निरीक्षक पद राळेभात दुहेरी हत्याकांडानंतर तात्काळ नियुक्ती करण्यात आलेले पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी पदभार स्वीकारला, मात्र तरीही गुन्हेगारीचे सत्र थांबताना दिसत नाही. पोलिसांनी सध्या फक्त हातभटट्या उध्वस्त करण्यावर भर दिला असून, शहरासह तालुक्यात खुलेआम अवैध धंदे जोमात सुरू आहेत.

शहरातील वाढती गुन्हेगारी आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस वेगवेगळ्या उपाययोजना करत असतात, असे असले तरी शहरातील रात्रीच्या वेळी घडणार्‍या गुन्ह्यांचा आकडा मात्र कमी होताना दिसत नाही. रात्रीच्या काळोखात मायानगरीमध्ये गुन्हेगारांचाच सुळसुळाट सुरू असल्याचे वास्तव पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. रात्रीची गुन्हेगारी कमी करण्याचे एक आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक पदावर नूतन पो.नि. पांडुरंग पवार विराजमान झाले आहेत. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांची डोकेदुखी वाढली असेल, यात शंका नाही, मात्र या परिस्थितीतून मार्ग काढून गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल, आणि या कामात त्यांची कसोटी लागणार असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.

तालुक्यातील वाढती गुन्हेगारी डोके वर काढत आहे. मात्र, केवळ किरकोळ कारवाई करून स्वत:ची पाठ थोपटून घेणार्‍या पोलिसांकडून गुन्हे रोखण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. तालुक्यात गुन्हेगारीचे मोठे जाळे पसरत चालले आहे. लूटमार, मारामार्‍या, चोर्‍या या घटनांमुळे अधिक बेजार झालेल्या नागरिकांना आता खून, दरोडा याची धास्ती वाटू लागली आहे. तालुक्यातील वातावरण दूषित होत आहे. राजकीय वैमनस्य आणि आर्थिक लाभापोटी गुन्ह्याचे प्रमाण अधिकच वाढत असल्याचे बोलले जाते. नव्या अधिकार्‍यांना गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान असतानाच स्थानिक गुन्हेगारांना काबूत ठेवण्यासाठी शक्ती खर्च करावी लागणार आहे. सट्टा, चोरी, दरोडा जुगार, मटका, सोरट, रोड

रोमिओ, लुटमार, अवैध वाहतूक, बेकायदा दारू विक्री यांसारख्या तुलनेत लहानसहान गुन्ह्यांप्रमाणेच अलिकडच्या काळात झालेली वाढ तसेच गटांमध्ये होणारी धुसफूस ते गंभीर हाणामार्‍या, खून, दरोडे, वाढता सायबर क्राईम याबाबत अलर्ट राहावे लागणार आहे. अवैध धंद्यांपासून केवळ जामखेड शहरच सुटले नाही तर, तालुक्यातही बिनदिक्कतपणे मटका, जुगार खेळला जात आहे. विशेष म्हणजे त्या-त्या भागातील पोलिस अधिकारी, बीट जमादार यांना मॅनेज करून हा व्यवसाय राजरोसपणे चालविला जातो. खुलेआम हा व्यवसाय चालत असल्याने गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून चोर्‍या-दरोड्यांचे प्रमाणात वाढ झाली आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या तालुक्यातील गुंडगिरी थोपविण्याची जबाबदारी पेलण्याचे आव्हान नवीन अधिकार्‍यांसमोर आहे.

अवैध धंद्यांना कोणाचे अभय ? तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, दहशत, वाळू तस्करी, गावठी कट्टे, या माध्यमातून टोळी युद्ध सुरू आहे. सध्या जामखेड तालुक्यात अनेक अवैध धंदे जोरात सुरू आहेत, मात्र पोलिस याकडे आंधळयाची भूमिका घेत असल्याने शहर सह तालुक्यात खुलेआम अवैध धंद्यांना पाठबळ मिळत आहे. दारू, गांजा, मटका, जूगार, चंदन तस्कर, सोरट असे अनेक अवैध धंदे बिट अंमलदारांच्या आशीर्वादाने सुरू आहेत. गल्लीबोळात सुरू असलेले जुगाराचे अड्डे, हॉटेल व ढाब्यावर मिळणारी बनावट दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आज आपणास पहावयास मिळत आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच शहरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकारांकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. तसेच शहरात गुन्हेगारी घटना घडत आहेत; मात्र तक्रारदार पोलिस ठाण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्याचे टाळले जाते. त्यामुळे कागदावर गुन्हे कमी दिसत आहेत, मात्र याला आळा बसणे तितकेच गरजेचे आहे